Rajesh Exports Share Price : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी गोल्ड रिफायनरी आणि ज्वेलरी निर्यातदार ‘राजेश एक्सपोर्ट्स’ कंपनी आणि त्यांच्या प्रमोटर्सवर बाजार नियामक सेबीने मोठी कारवाई केली आहे. ‘राजेश एक्सपोर्ट्स’ने आपल्या कमाईच्या आकड्यात तब्बल १५.१५ लाख कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. सेबीच्या कारवाईनंतर सरकारी विमा कंपनी ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (LIC) आणि आघाडीची सरकारी ‘कॅनरा बँक’ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सेबीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर गुरुवारी बाजार उघडताच कंपनीच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले असून, वित्तीय संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
बाजार उघडताच शेअर्स कोसळले, लागला लोअर सर्किट
सेबीने केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर गुरुवारी शेअर बाजारात राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्सची जोरदार पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा शेअर ४.९९ टक्क्यांच्या तीव्र घसरणीसह १०३.९२ रुपयांवर आला असून त्यात लोअर सर्किट लागले. सेबीने कडक पावले उचलत कंपनी आणि तिचे चेअरमन राजेश मेहता यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत शेअर बाजारात शेअर्सच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
एलआयसीची १० टक्क्यांहून अधिक हिस्सेदारी
या महाघोटाळ्यामुळे देशातील सर्वात मोठी संस्थागत गुंतवणूकदार असलेल्या ‘एलआयसी’ला मोठा हादरा बसला आहे. मार्च २०२६ च्या तिमाहीतील अधिकृत आकडेवारीनुसार, राजेश एक्सपोर्ट्समध्ये एलआयसीची तब्बल १०.८० टक्के एवढी मोठी भागीदारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सप्टेंबर २०२३ पासून एलआयसीने या कंपनीतील आपली हिस्सेदारी कामय ठेवली होती. म्हणजे गेल्या ३ वर्षात इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा कोणताही आढावा न घेतल्याने व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता शेअर्स गडगडल्याने एलआयसीला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ वर्षात एकाही म्युच्युअल फंडाने राजेश एक्सपोर्ट कंपनीत गुंतवणूक केली नाही. तर दुसरीकडे एलआयसीने मात्र आपली गुंतवणूक वाढवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कॅनरा बँक कारवाईच्या तयारीत
या प्रकरणात कर्ज देणारी आघाडीची सरकारी कॅनरा बँक आता एक्सन मोडमध्ये आली आहे. राजेश एक्सपोर्ट्सने कर्जाच्या परतफेडीच्या अटी पूर्ण न केल्यामुळे कॅनरा बँकेने या खात्याला ‘स्ट्रेस्ड लोन’ श्रेणीत टाकले होते. कंपनीवर बँकेचे एकूण ५०९ कोटी रुपये थकीत आहे. कॅनरा बँकेने आता या संपूर्ण कर्जाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक एका खुल्या लिलावाद्वारे हे कर्ज इतर वित्तीय संस्थांना हस्तांतरित करणार आहे. कॅनरा बँक आता या कंपनीला दिवाळखोरीच्या प्रक्रियेत ओढण्याच्या तयारीत असून, कंपनीला दिलेल्या कर्जातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.
राजेश एक्सपोर्ट्सने नेमका काय घोटाळा केलाय?
आर्थिक वर्ष २०२१ ते २०२५ दरम्यान कंपनीने आपल्या एकूण रिपोर्ट केलेल्या महसुलाच्या ९९.८% हिस्सा म्हणजेच तब्बल १५.१५ लाख कोटी रुपये परदेशी उपकंपन्यांच्या (खासकरून स्वित्झर्लंडच्या ‘वालकाम्बी एसए’) नावाने खोटा दाखवला. वालकाम्बीच्या ऑडिटेड खात्यात ही कमाई कुठेच दिसली नाही. तर आर्थिक वर्ष २०२१ ते २०२४ दरम्यान कंपनीच्या स्टँडअलोन रेव्हेन्यूमध्ये १२,५५७ कोटी रुपयांची गडबड सापडली आहे. म्हणजे जी कमाई कधी झालीच नाही, ती कमाई दाखवून कंपनीने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे.
वैयक्तिक व्यवहार कंपनीच्या नावावर
चेअरमन राजेश मेहता यांनी स्वतःच्या नावावर केलेले ११,४८७ कोटींच्या विक्रीचे आणि ११,४८८ कोटींच्या खरेदीचे डेरिव्हेटिव्ह व्यवहार चक्क कंपनीची अधिकृत विक्री आणि खरेदी म्हणून दाखवले. याशिवाय म्युच्युअल फंड आणि एफडीमधून मिळालेले व्याज ‘मुख्य कामकाजातून मिळालेले उत्पन्न’ म्हणून दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.
