ram mandir donation details marathi : अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिराला मिळालेल्या देणग्यांमध्ये अफरातफर झाल्याप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे ८० लाख रुपये रोख, मौल्यवान वस्तू आणि परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ने आपल्या आर्थिक व्यवहारांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये आतापर्यंत मंदिराला मिळालेले दान, वर्षभराची कमाई, गुंतवणूक आणि खर्च यांचा समावेश आहे.

वर्षभरात राम मंदिराची कमाई किती?

१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीत ट्रस्टला विविध माध्यमांतून एकूण ८२.७८ कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत. देणग्यांव्यतिरिक्त बँकांमधील ठेवींवरील व्याजातून ट्रस्टने मोठी कमाई केली असून, ११ महिन्यांत ट्रस्टचे एकूण उत्पन्न २२०.८१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामध्ये मंदिरातील दानपेट्यामधून ५४.७९ कोटी, काउंटरवर मिळालेली रोख रक्कम १८.८८ कोटी, ऑनलाईन देणग्या ८.३३ कोटी, तर परदेशी देणग्यामधून ०.७८ कोटी रुपये मिळाले आहेत.

केवळ व्याजापोटी १३८ कोटी रुपयांचे उत्पन्न

थेट देणग्यांव्यतिरिक्त, ट्रस्टने अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक मधील आपल्या ठेवींवर याच काळात तब्बल १३८.०३ कोटी रुपयांचे व्याज मिळवले आहे. थेट देणग्या आणि व्याज मिळून ट्रस्टचे एकूण उत्पन्न २२०.८१ कोटी रुपये झाले, तर याच ११ महिन्यांच्या काळात मंदिराशी संबंधित कामांवर ३६४.४४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

२,१०० कोटी रुपये बँकांमध्ये सुरक्षित

ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर उभारणीचा मोठा खर्च झाल्यानंतरही ट्रस्टकडे सध्या सुमारे २,१०० कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. हा सर्व निधी विविध बँकांमध्ये मुदत ठेवी आणि इतर सुरक्षित वित्तीय साधनांमध्ये गुंतवण्यात आला आहे.

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (अयोध्या शाखा): ८८९.५२ कोटी (एफडी)
  • पंजाब नॅशनल बँक : ६९४.४९ कोटी (एफडी)
  • बँक ऑफ बडोदा : ३१३.८७ कोटी (एफडी)
  • म्युच्युअल फंड : ८७ कोटी
  • ऑटो-स्वीप खाते : ४० कोटी

२०२० पासून आतापर्यंत ४,५७५ कोटींचा निधी

फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर केंद्र सरकारने या १५ सदस्यीय स्वायत्त ट्रस्टची स्थापना केली होती. ५ फेब्रुवारी २०२० पासून ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ट्रस्टला देणग्या आणि इतर माध्यमांतून एकूण ४,५७५ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले आहे.

सध्या या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून महंत नृत्य गोपाल दास आणि सरचिटणीस म्हणून चंपत राय जबाबदारी पाहत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा हे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून प्रकल्पाच्या देखरेखीचे काम करत आहेत.