Ranveer Singh Net Worth: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांचे यश व आपल्या अभिनयामुळे त्याने मोठी वाहवा मिळवली. यानंतर आता रणवीर सिंह एका वादामुळे चर्चेत आला आहे. फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ चित्रपटातून माघार घेतल्यामुळे मुंबईस्थित ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने (FWICE) रणवीर सिंहचा समावेश असलेल्या कोणत्याही प्रकल्पावर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर रणवीर सिंह अभिनयाव्यतिरिक्त इतर कोणत्या व्यवसायातून उत्पन्न कमावतो, हे पाहूया.
कॅमेऱ्यासमोरचे करिअर हे मर्यादित असते. काहींसाठी ते अल्पजीवी असते, तर काहींसाठी अनेक दशकांपर्यंत टिकणारे. परंतु स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष मात्र सर्वांसाठीच सारखा असतो. रणवीर सिंहला ही बाब त्याच्या बरोबरीच्या बहुतेक कलाकारांपेक्षा खूप आधीच उमजलेली असावी, म्हणूनच तो तीन कंपन्यांचा सह-संस्थापक आहे.
अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवत असतानाच रणवीर सिंहने ‘बोल्डकेअर’ (BoldCare), ‘सुपरयू’ (SuperYou) आणि ‘एबीडी मायस्ट्रो’ (ABD Maestro) या तीन कंपन्यांची सह-स्थापना केली आहे. तो या तिन्ही कंपन्यांचा सह-संस्थापक आहे. या प्रकरणाशी संबंधित एका जवळच्या सूत्राने या माहितीला दुजोरा दिला असल्याचे वृत्त ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ या संकेतस्थळाने दिले आहे.
बोल्डकेअर
‘बोल्डकेअर’ (Oddity Healthcare Private Limited) ची स्थापना २०२० मध्ये रजत जाधव, राहुल कृष्णन, हर्ष सिंग, मोहित यादव आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (जो सह-संस्थापक आणि सह-मालक म्हणून नंतर सहभागी झाला) यांनी केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर या कंपनीचा वार्षिक महसूल ७९.९ कोटी रुपये इतका होता. बोल्डकेअर ही एक अशी स्टार्टअप कंपनी आहे, जी लैंगिक आरोग्यासाठीची किट्स, वैयक्तिकृत उपचार, डॉक्टरांच्या चिठ्ठीवरील (प्रिस्क्रिप्शन) औषधे आणि नैसर्गिक पूरक आहार (सप्लिमेंट्स) यांची अत्यंत गोपनीय पद्धतीने घरपोच सेवा पुरवते.
२०२४ मध्ये रणवीर सिंहची ‘बोल्डकेअर’ची जाहिरात प्रचंड व्हायरल झाली आणि तिला ३० लाखांहून (३ मिलियन) अधिक व्ह्यूज मिळाले होते. या जाहिरातीत रणवीरने अडल्ट फिल्मअभिनेता स्टीव्हन वोल्फ (जॉनी सिन्स) सोबत काम केले असून, गर्भनिरोधकाच्या जाहिरातीत दिसणारा तो मोजक्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक ठरला आहे.
सुपरयू
‘एलिट माइंडसेट’च्या मालकीचा प्रोटीन स्नॅकिंगचा D2C ब्रँड ‘सुपरयू’ने रणवीर सिंहला कंपनीच्या इक्विटीमध्ये ५०% हिस्सा दिला आहे. एफएमसीजी (FMCG) क्षेत्रात प्रवेश केल्यावर रणवीर सिंह केवळ पॅकेजिंगवरील एक चेहरा किंवा जाहिरातीमागील आवाज राहिला नाही, तर तो स्वतःच एक ब्रँड बनला आहे.
रंगीला
रणवीर सिंहच्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप असलेला, त्याचा व्होडका ब्रँड ‘रंगीला’ हे कदाचित रणवीर सिंहचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, ‘अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेड’ची सुपर-प्रीमियम आणि लक्झरी स्पिरिट्स उपकंपनी असलेल्या ‘एबीडी मेस्ट्रो प्रा. लि.’ने ‘रंगीला कंटेम्पररी इंडियन व्होडका’ सादर केली. एबीडी मेस्ट्रोमध्ये सह-संस्थापक आणि क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून सहभागी झाल्यावर, रणवीर सिंहने केवळ आपल्या स्वभावाशी (स्पिरिट) प्रामाणिक राहून ‘स्वदेशी’ हा टॅग अभिमानाने जपला आहे.
इतर गुंतवणूक
रणवीर सिंह याच्या पूर्वीच्या काही गुंतवणुकींमध्ये ‘शार्क टँक इंडिया’च्या परीक्षक विनीता सिंह यांच्या ‘शुगर कॉस्मेटिक्स’मधील हिस्सा आणि अमन गुप्ता यांच्या ‘boAt’ या ऑडिओ ब्रँडच्या भागीदारीचा समावेश आहे. तो आता ‘शुगर कॉस्मेटिक्स’ किंवा ‘एपगॅमिया’ या योगर्ट ब्रँडमध्ये गुंतवणूकदार नसला, तरी सिंहच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘कल्ट फिटनेस’ या वेलनेस आणि फिटनेस प्लॅटफॉर्ममध्ये त्याचा एक अघोषित हिस्सा आहे. याबाबत ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.
‘धुरंधर’च्या यशानंतर जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँड ‘ॲडिडास’ने रणवीर सिंहसोबत एक स्नीकर कोलॅबोरेशन सादर केले, ज्यात त्याची स्ट्रीट-स्टाईल सौंदर्यदृष्टी आणि मॅक्सिमलिस्ट (भव्य) व्यक्तिमत्त्व दिसून येते.
रणवीर सिंहची एकूण संपत्ती
‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, रणवीर सिंहची एकूण संपत्ती (Net Worth) अंदाजे ४०० कोटी रुपये इतकी आहे. तसेच, त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ १७०.७ दशलक्ष डॉलर्स असल्याचेही सांगितले जाते. यावरून हे स्पष्ट होते की, त्याचे आकर्षण केवळ अभिनयापुरतेच मर्यादित नसून, ते त्याहीपलीकडे विस्तारलेले आहे.
News18 च्या एका वृत्तानुसार, रवणीर एका चित्रपटासाठी ३० ते ५० कोटी रुपये मानधन घेतो. अभिनयासोबतच, रणवीर ‘ब्रँड डील्स’मधूनही मोठी कमाई करतो. जाहिरातींच्या प्रसिद्धीसाठी (Endorsements) तो ३ ते ५ कोटी रुपये, तर सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टसाठी सुमारे ८० लाख रुपये आकारतो.
