Success Story Of SIS Security Founder: देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांचे स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न असते. यातील बहुतेकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या अडचणींवर मात करतात तेच या क्षेत्रात यशस्वी होऊन आपला ठसा उमटवतात. आज आपण अशा एका उद्योजकाची यशोगाथा पाहणार आहोत, जे काही दशकांपूर्वी महिना २५० रुपयांवर पत्रकार म्हणून नोकरी करत होते. रवींद्र किशोर सिन्हा, असे या उद्योजकाचे नाव आहे.

रवींद्र किशोर सिन्हा यांनी बिहारची राजधानी पाटण्यात पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा त्यांचा मासिक पगार सुमारे २५० रुपये होता. आज पाच दशकांहून अधिक काळानंतर त्यांनी उभारलेली कंपनी आता शेअर बाजारातील एक लिस्टेड कंपनी आहे. या कंपनीचे एकत्रित उत्पन्न जवळपास १६,००० कोटी रुपये इतके आहे.

राजकीय नेत्याकडून प्रेरणा

सिन्हा यांनी १९७४ मध्ये पाटण्यात ‘सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस’ (SIS) या कंपनीची स्थापना केली. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या एका आवाहनानंतर त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. निवृत्त लष्करी जवानांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार मिळवून देण्यात मदत करावी, असे प्रोत्साहन नारायण यांनी सिन्हा यांना दिले होते.

भारतातील खासगी सुरक्षा क्षेत्र जेव्हा बऱ्याच अंशी विखुरलेल्या अवस्थेत होते, त्या काळात प्रशिक्षणात गुंतवणूक करण्याचा निर्णय सिन्हा यांनी घेतला होता. त्यांच्या कंपनीने १९८४ मध्ये सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन केली आणि त्यानंतर १९८६ मध्ये ‘ग्रॅज्युएट ट्रेनी ऑफिसर’ कार्यक्रम सुरू केला. कंपनीचा विस्तार जसजसा होत गेला, तसतशी त्यांनी आपली प्रशिक्षणविषयक पायाभूत सुविधाही टप्प्याटप्प्याने वाढवली.

ही कंपनी १९९० च्या दशकात उत्तर भारतात दाखल झाली आणि त्यानंतर तिने दक्षिण व पश्चिम भारतातील बाजारपेठांमध्ये आपला विस्तार केला. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताची अर्थव्यवस्था खुली झाल्यामुळे, संघटित व्यवसाय, कार्यालये, कारखाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या वाढीमुळे खासगी सुरक्षा व फॅसिलिटी-मॅनेजमेंट सेवांसाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली.

सिन्हा यांच्या कंपनीने २००८ मध्ये ‘चब सिक्युरिटी’चा ऑस्ट्रेलियन व्यवसाय विकत घेतला आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीने न्यूझीलंड आणि सिंगापूरमध्येही आपला विस्तार केला.

शेअर बाजारात पदार्पण

पुढे ऑगस्ट २०१७ मध्ये सिन्हा यांच्या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दणक्यात प्रवेश केला. आयपीओमुळे कंपनीला सार्वजनिक बाजारपेठेत प्रवेश मिळाला, तर दुसरीकडे इतर कंपन्यांचे अधिग्रहण करणे हा तिच्या विस्तार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिला. सूचीबद्ध झाल्यानंतर, SIS ने भारतातील ‘SLV सिक्युरिटी सर्व्हिसेस’ तसेच न्यूझीलंड आणि सिंगापूरमधील व्यवसायांमध्ये हिस्सा संपादन केला.

१६ हजार कोटींची कंपनी

कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एकत्रित महसूल सुमारे १६,००० कोटी रुपये इतका होता. या वर्षासाठी कंपनीने सुमारे ७१७ कोटी रुपयांचे EBITDA नोंदवले, तर करपश्चात एकत्रित नफा सुमारे १३८ कोटी रुपये होता.

कंपनीचे कामकाज भारत तसेच ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझीलंड यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चालते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३.५ लाखांहून अधिक आहे.