Razorpay Success Story of how Harshil Mathur transitioned from a high-paying corporate job to conquering fintech: भारतीय फिनटेक क्षेत्रात आज ‘रेझरपे’चे मोठे नाव आहे. पण, ही कंपनी उभारण्यासाठी संस्थापक हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांना अनेक अपयश, अडचणी आणि नकारांचा समाना करावा लागला होता. सह-संस्थापक हर्षिल माथूर यांनी नुकतेच कंपनीच्या प्रवासावर भाष्य केले आहे. त्यांनी आणि त्यांचे सहकारी शशांक कुमार यांनी ‘रेझरपे’ची उभारणी करण्यापूर्वी बँकांकडून मिळालेले जवळपास १०० नकार कसे पचवले आणि त्यावर कशी मात केली, हे सांगितले. आज ‘रेझरपे’चे मूल्यांकन सुमारे ६४ हजार ५०० कोटी रुपये इतके आहे. त्यांचा हा प्रवास म्हणजे चिकाटी, अपयशातून शिकणे आणि हजारो स्टार्टअप्सना भेडसावणारी समस्या सोडवणे, याचे एक उत्तम उदाहरण आहे.
हर्षिल माथूर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अबुधाबीमधील ‘श्लम्बरजर’ या कंपनीत अत्यंत प्रतिष्ठित अशी ‘कॅम्पस प्लेसमेंट’ मिळवली. या नोकरीत त्यांना सहा अंकी पगार, राहण्याची आलिशान सोय आणि अनेक उत्तम सुविधा मिळत होत्या. मात्र, काही महिन्यांतच त्यांना जाणीव झाली की ही कारकीर्द आपल्यासाठी योग्य नाही.
“ही नोकरी माझ्यासाठी नाही, हे मला अगदी स्पष्टपणे समजले होते. मला बसून कोडिंग करायला आवडते. मला प्रत्यक्ष ‘फील्ड’वर जाऊन काम करायचे नव्हते,” असे माथूर यांनी सांगितले. आर्थिक सुरक्षितता देणारी आणि भरघोस पगार असलेली ती नोकरी त्यांनी का सोडली, याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी हे नमूद केले.
आपल्या नियमित कामासोबत हर्षिल माथूर आपला मोकळा वेळ कॉलेजमधील मित्र शशांक कुमार यांच्यासोबत साईड प्रोजेक्ट्स बनवण्यात घालवत असत. क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म विकसित करत असताना, या दोघांच्या लक्षात आले की ऑनलाइन पेमेंट्सचा समावेश करणे कठीण होते. “आम्हाला वाटले होते की पेमेंट्स हा सर्वात सोपा भाग असेल. पण ते बनवण्यातील तो सर्वात कठीण भाग ठरला”, असे ते म्हणाले.
बेंगळुरू आणि पुण्यातील स्टार्टअप संस्थापकांशी बोलल्यानंतर, त्यांना जाणवले की जवळजवळ प्रत्येकजण सारख्याच आव्हानाचा सामना करत आहे. अनेकांनी त्यांना डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम स्वीकारण्याची सूचना केली कारण डिजिटल पेमेंट सेट करणे कठीण होते. या समस्येतून या दोघांना खात्री पटली की इथे व्यवसायाची एक खूप मोठी संधी आहे.
यामुळे स्वतःचे पेमेंट गेटवे तयार करण्याचा निर्धार करून, माथूर आणि कुमार यांनी देशभरातील बँकांकडे जाण्यास सुरुवात केली. त्यांनी बँकांच्या विविध शाखांना भेट दिली, LinkedIn द्वारे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांची कल्पना वारंवार मांडली. पण यातील जवळपास सर्वांनीच त्यांच्या कल्पनेला नकार दिला.
“त्या तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत मी जवळपास १०० बँकरची भेट घेतली असेल आणि बहुतेकांनी मला नकारच दिला”, असे माथूर यांनी सांगितले. हार मानण्याऐवजी, त्यांनी प्रत्येक नकाराचे रूपांतर एका धड्यात केले.
“आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी आम्हाला काहीतरी अधिक माहिती दिली. आमच्याकडून काय राहून गेले होते आणि काय समजले नव्हते, हे त्यांनी आम्हाला सांगितले”, असे सांगून त्यांनी पुढे नमूद केले की, प्रत्येक संभाषणामुळे त्यांना ‘पेमेंट्स इकोसिस्टम’मधील गुंतागुंत अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
अन् नशीब पालटले
पुढे बँकांची मंजुरी मिळण्यापूर्वीच ‘वाय कॉम्बिनेटर’मध्ये निवड झाल्यामुळे ‘रेझरपे’चे नशीब पालटले. यामुळे संस्थापकांना जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्याच्या पद्धतींची ओळख झाली आणि त्यांच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांशी त्यांचा संपर्क घडला.
आज ‘रेझरपे’ ही भारतातील सर्वात मौल्यवान फिनटेक कंपन्यांपैकी एक बनली आहे. माथूर यांचा प्रवास हे सिद्ध करतो की, एखाद्या गोष्टीला नकार मिळणे म्हणजे प्रवासाचा अंत नव्हे. जिद्द, सतत शिकण्याची वृत्ती आणि ग्राहकांच्या वास्तविक समस्या सोडवण्यावर दिलेला भर यामुळे, सुरुवातीला मिळालेल्या जवळपास १०० नकारांनंतरही अखेरीस अब्जावधी डॉलर्सच्या यशाची गाथा साकार झाली.
