RBI Bulk Deposit Interest Rate Rules : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी मोठा निर्णय घेताना बँकांना मोठ्या रकमेच्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्यास मुभा दिली. अशा ठेवींवर बँका ठेवींच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या तरलता गरजेनुसार वेगवेगळे व्याजदर ठरवू शकतील. मोठ्या ठेवींवरील वेगवेगळ्या व्याजदरांबाबतचे हे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

RBI च्या नवीन नियमानंतर काय बदलणार?

या निर्णयाचा परिणाम प्रामुख्याने मोठ्या रकमेच्या ठेवींवर (बल्क डिपॉझिट्स) होईल. सामान्य किरकोळ ठेवीदारांच्या व्याजदरांमध्ये यामुळे तात्काळ बदल होईलच, असे नाही. व्याजदर ठरविण्यासंदर्भात बँकांना अधिक लवचिकता देणाऱ्या या नव्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला प्रत्येक कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या संकेतस्थळावर विविध मुदतींच्या मोठ्या ठेवींवरील (बल्क डिपॉझिट) व्याजदर जाहीर करावे लागतील. एकदा प्रसिद्ध केलेले व्याजदर त्या दिवसासाठी कायम राहतील आणि दिवसादरम्यान त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

एचडीएफसी बँकेच्या घटनेमुळे निर्णय घेतला?

नवीन नियम हा बँकांकडून मोठ्या रकमेच्या ठेवी आकर्षित करण्यासाठी देऊ करण्यात येणाऱ्या वाढीव व्याजदराच्या प्रथेला पाहता घेतला गेल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेवी मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या नियम व संकेतांचा भंग केला म्हणून, एचडीएफसी बँकेने तिच्या सर्वोच्च तीन अधिकाऱ्यांना लाख रुपयांचा दंड केल्याचे प्रकरण ताजे आहे. रिझर्व्ह बँकेचे ताजे नियम या संबंधाने स्पष्ट निर्देश देणारे आहेत.

दीर्घकालीन ठेवींना जास्त व्याजदर मिळणार

आतापर्यंत बँका ठेवीची रक्कम, मुदत आणि मुदतपूर्व पैसे काढण्याच्या अटी या निकषांवर व्याजदर निश्चित करत होत्या. आता त्यामध्ये ठेवी किती स्थिर आहेत किंवा त्या अल्पावधीत काढल्या जाण्याची शक्यता किती आहे, हा निकषही वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दीर्घकाळ बँकेत राहण्याची शक्यता असलेल्या ठेवींना आणि लवकर परत जाण्याची शक्यता असलेल्या ठेवींना वेगवेगळे व्याजदर देणे बँकांना शक्य होणार आहे. मोठ्या ठेवींना आकर्षित करण्यासाठी बँकांना वेगळे व्याजदर देण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे बँकांना निधीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येईल आणि नियामक अटींचे पालन करणेही सुलभ होईल.

सर्वसामान्य ठेवीदारांवर काय परिणाम होणार?

नव्या नियमांचा सर्वसामान्य ठेवीदारांनाही फायदा होणार आहे. दररोज अद्ययावत व्याजदर उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना कोणत्या बँकेत कोणत्या कालावधीसाठी किती व्याज मिळणार आहे, याची स्पष्ट माहिती मिळेल. बँकांमध्ये पारदर्शकता वाढेल, स्पर्धा अधिक तीव्र होईल आणि मोठ्या रकमेच्या ठेवी राखणाऱ्या ग्राहकांनाही व्याजदर निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजेल. जरी या बदलांचा सर्वाधिक परिणाम मोठ्या ठेवींवर होणार असला, तरी सर्व प्रकारच्या मुदतठेवींचे व्याजदर जाहीर करण्याची सक्ती झाल्याने सर्वच ठेवीदारांना त्याचा लाभ होणार आहे.

सर्व शाखांत मात्र एकसमान व्याजदर

मोठ्या ठेवींसहित एकूण ठेवींवर दिले जाणारे व्याजदर बँकेच्या सर्व शाखांमध्ये, सर्व ग्राहकांसाठी मात्र एकसमान असले पाहिजेत. शिवाय, बँकेच्या कोणत्याही कार्यालयात, एकाच तारखेला स्वीकारलेल्या, एका ठेवीवर आणि त्याच रकमेच्या दुसऱ्या ठेवीवर दिल्या जाणाऱ्या व्याजाच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही.