RBI Gold Sell News: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या परकीय चलन मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सुमारे १२ अब्ज डॉलर्सचे (सुमारे १.०२ लाख कोटी रुपये) सोने विकल्याचा दावा करणारे वृत्त, बँकेने फेटाळून लावले आहे. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात आरबीआयने स्पष्ट केले आहे की, आजच्या तारखेनुसार त्यांच्याकडील सोन्याचा प्रत्यक्ष साठा ८८०.५२ टन इतकाच कायम आहे.

“भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सोने विक्रीबाबत काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्या रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत. या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे रिझर्व्ह बँक ठामपणे स्पष्ट करते. या संदर्भात असे स्पष्ट करण्यात येते की, रिझर्व्ह बँक आपल्या ‘मासिक बुलेटिन’मध्ये आपल्याकडील सुवर्णाच्या प्रत्यक्ष साठ्याची माहिती जाहीर करते. या बुलेटिनची नवी आवृत्ती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, आजच्या तारखेनुसार सोन्याचा प्रत्यक्ष साठा ८८०.५२ टन इतका असून, त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे अशा बाबींच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी प्रकाशित केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असा सल्ला देण्यात येत आहे”, असे आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक ब्रिज राज यांनी निवेदनात म्हटले आहे.

RBI Press Release
आरबीआयचे पत्रक. (Photo: RBI)

एका वृत्तसंस्थेने सोन्याच्या विक्रीबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे स्पष्टीकरण दिले आहे. सदर वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, २२ मे २०२६ रोजी संपणाऱ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत रिझर्व्ह बँकेने सुमारे १२ अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे १ लाख कोटी रुपये) मूल्याचे सोने विकले आहे.

या वृत्तात असे सुचवण्यात आले होते की, रुपयावरील दबाव आणि वाढते आयात बिल या पार्श्वभूमीवर, भारताचा परकीय चलन साठा बळकट करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी ही कथित विक्री करण्यात आली होती. तत्पूर्वी, आज दिवसाच्या सुरुवातीलाच अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, मध्यवर्ती बँकेने अशा प्रकारचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनेही या सोने विक्रीच्या बातम्यांबाबत एक ‘फॅक्ट-चेक’ प्रसिद्ध केला असून, हे वृत्त खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा “३१ मार्च २०२६ रोजी १६.७०% पर्यंत वाढला आहे.”

“आरबीआयच्या माहितीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस १३.९२% वरून वाढून ३१ मार्च २०२६ रोजी १६.७०% झाला आणि त्यानंतर २२ मे २०२६ पर्यंत तो आणखी वाढून १६.८५% वर पोहोचला”, असे पीआयबीने पोस्टमध्ये म्हटले आहे.