Reserve Bank of India : भारतीय कुटुंबांच्या बचतीची पद्धत आता वेगाने बदलत आहे. एकेकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘बचत ठेवी’ला पसंती देणारा सामान्य माणूस आता आपला मोर्चा शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांकडे वळवत आहे. याच बदलत्या ट्रेंडने भारतीय रिझर्व्ह बँकेची झोप उडवली आहे. बँकिंग व्यवस्थेच्या स्थिरतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आरबीआय का आहे चिंतेत?
रिझर्व्ह बँकेच्या चिंतेचे मुख्य कारण म्हणजे बँकांकडील ‘क्रेडिट-डेपॉझिट रेशो’ बिघडत चालला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, बँका ज्या वेगाने लोकांना आणि कंपन्यांना कर्ज वाटत आहेत, त्या वेगाने त्यांच्याकडे ठेवी जमा होत नाहीत. बँकांकडे पैसाच कमी आला, तर कर्ज देण्याची त्यांची क्षमता कमी होईल आणि याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होऊ शकतो.
बँकांतील पैसा जातोय कुठे?
तज्ज्ञांच्या मते, आता भारतीय कुटुंबांची बचत केवळ तिजोरीत किंवा सेविंग्स अकाउंटमध्ये पडून राहत नाही. जास्त परताव्याच्या आशेने हा पैसा आता वेगवेगळ्या पर्यायांकडे वळत आहे. शेअर बाजार, म्यूचुअल फंड, विमा क्षेत्र अशा पर्यांकडे गुंतवणूकदार वळत आहेत. बँकेच्या एफडीपेक्षा या पर्यायांमध्ये मिळणारा परतावा अधिक असल्याने लोक बँकांमध्ये पैसा ठेवण्याऐवजी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.
अस्थिरतेचा वाढता धोका
आरबीआयला केवळ ठेवी कमी होण्याचीच भीती नाही, तर ठेवींच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाचीही काळजी आहे. पूर्वी बँकांकडे सामान्य कुटुंबांचा ‘स्वस्त आणि स्थिर’ पैसा असायचा. आता बँकांना म्युच्युअल फंडांसारख्या संस्थात्मक स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. हा पैसा अत्यंत चंचल मानला जातो. बाजारात थोडा जरी बदल झाला, तरी हा पैसा बँकिंग सिस्टिममधून बाहेर पडू शकतो.
तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
आरबीआयने बँकांशी चर्चा सुरू केली असून, येणाऱ्या काळात ग्राहकांसाठी दोन महत्त्वाचे बदल दिसू शकतात.
१. बचतीवर सुवर्णसंधी : बँका आपल्या ठेवी वाढवण्यासाठी मुदत ठेवींवर व्याजदरात वाढ करू शकतात. तसेच, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ‘सेव्हिंग्स प्रॉडक्ट्स’ आणि लॉयल्टी स्कीम लाँच केल्या जाऊ शकतात.
२. कर्ज महागण्याची टांगती तलवार : दुसरीकडे, बँकांना ठेवी गोळा करण्यासाठी जास्त व्याज द्यावे लागले, तर त्यांचा खर्च वाढेल. हा खर्च भरून काढण्यासाठी बँका गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.
पुढील पाऊल काय?
स्थिर ठेवी कशा आकर्षित करता येतील? यासाठी आरबीआयने बँकांकडून सूचना मागवल्या आहेत. गरज पडल्यास आरबीआय नियमांमध्ये बदल करून बँकांना अधिक आकर्षक योजना आणण्याची परवानगी देऊ शकते. एकूणच, येणारा काळ हा ‘बचत’ करणाऱ्यांसाठी फायद्याचा, तर ‘कर्ज’ घेणाऱ्यांसाठी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो.
