Raghuram Rajan Rupee vs Dollar Historic Recovery: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती, याचा महागाईवर आणि शेअर बाजारावर झालेला परिणाम व देशांतर्गत घटकांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बाजारातील आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतीय रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९.८८ टक्क्यांनी अवमूल्यन झाले. गेल्या १४ वर्षांतील ही रुपयाची सर्वात मोठी वार्षिक घसरण ठरली आहे. रुपयाच्या या पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कशी थांबवली होती ते जाणून घेऊया.

रघुराम राजन यांनी रुपयाची घसरण कशी थांबवली होती?

रघुराम राजन यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये ‘आरबीआय’चे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हा केंद्रात पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सरकार होते. पदभार स्वीकारताच राजन यांच्यासमोर दोन परस्परसंबंधित समस्या होत्या. पहिली म्हणजे, रुपया डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमकुवत झाला होता आणि त्याचा विनिमय दर प्रति डॉलर जवळपास ६९ रुपयांपर्यंत पोहोचला होता. दुसरी म्हणजे, भारताचा चलन साठा (Currency reserves) तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

परकीय चलन साठा ३५९.७६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवला

रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण होत असताना आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी निधीचा ओघ वाढवण्यासाठी बँकांना सवलतीच्या दरात चलन अदलाबदलीची (Discounted currency swaps) ऑफर दिली होती. विशेषतः, व्यावसायिक बँकांनी उभारलेल्या FCNR (B) ठेवींसाठी एक योजना जाहीर करण्यात आली, ज्यामुळे त्यांना त्या ठेवी आक्रमकपणे विकण्यास प्रोत्साहन मिळाले. २०१३ मध्ये आरबीआयने सुरू केलेल्या तीन महिन्यांच्या स्वॅप विंडोमध्ये या बँकांनी एकूण ३४ अब्ज डॉलर्स उभारले, ज्यामुळे राखीव निधी मजबूत होण्यास तसेच त्यावेळच्या घसरणाऱ्या रुपयाचे संरक्षण करण्यास मदत झाली.

या उपाययोजनांमुळे रघुराम राजन यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात, परकीय चलन साठा सप्टेंबर २०१३ मधील २४९ अब्ज डॉलर्सवरून, १ एप्रिल २०१६ पर्यंत ३५९.७६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला होता.

सध्या काय आहे रुपयाची परिस्थिती?

२०२६ या कॅलेंडर वर्षात रुपयाचे मूल्य ९.८८ टक्क्यांनी टक्क्यांनी घसरले आहे. तज्ज्ञांच्या मते, जर घसरणीचा सध्याचा वेग असाच कायम राहिला, तर रुपयाचे मूल्य आणखी घसरू शकते आणि ते प्रति डॉलर १०० या पातळी ओलांडू शकते. रुपयाची घसरण इराण-अमेरिका युद्धापुर्वीच सुरू झाली होती. कारण विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक सातत्याने काढून घेत होते. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य केवळ सुमारे १ टक्के घसरले होते.

पण, इराण युद्ध सुरू झाल्यानंतर रुपयाच्या घसरणीने वेग पकडला. यामुळे गेल्या आठवड्या रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९७.१५ ही आतापर्यंतची विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. रुपयाची सतत होणारी घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) हस्तक्षेप करत, सरकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर डॉलरची विक्री केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या ९६.११ वर व्यवहार करत आहे.