मुंबईः रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक सोमवारपासून येथे सुरू झाली. बैठकीतील निर्णयांची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बुधवारी, ५ ऑगस्टला करतील. तथापि या बैठकीतून व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे असून, महागाईत वाढ होण्याची जोखीम आहे. यामुळे पतधोरण समितीतील सहा सदस्यांकडून सावध पवित्रा घेतला जाईल आणि देशांतर्गत आर्थिक विकासाची गती कायम राखण्यावर भर दिला जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या आधी जूनमध्ये झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आले होते. पश्चिम आशियातील युद्धामुळे धोरणकर्त्यांनी त्यावेळी सावध पवित्रा घेऊन प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली होती.

रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरणात चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज वाढवून ५.१ टक्क्यांवर नेला. त्याआधी महागाई दर ४.६ टक्के पातळीवर राहण्याचे अनुमान होते. जागतिक पातळीवर ऊर्जेच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. याचाच परिणाम होऊन कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. याचबरोबर रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ६.९ टक्क्यांवरून कमी करून ६.६ टक्क्यांवर आणला आहे. ५ ऑगस्टला या द्वैमासिक बैठकीचे निर्णय जाहीर करताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे या सुधारीत अनुमानांबाबत तसेच नजीकच्या भविष्याविषयी समालोचनाकडे आर्थिक जगत आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

अर्थतज्ज्ञ काय सूचित करतात… 

जागतिक पातळीवरील अनिश्चितता कायम असून, युद्ध संपण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे खनिज तेल आणि चलनाच्या किमतीतील अस्थिरता कायम राहणार आहे. याचवेळी महागाईत वाढ होत असून, तिचा चढता आलेख कायम राहण्याची चिन्हे आहेत. मोसमी पावसातील अनियमिततेच्या परिणामामुळे खाद्यवस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. यामुळे यंदा पतधोरण समितीकडून व्याजदर स्थिर ठेवले जाण्याची शक्यता आहे.- मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा

दीर्घकाळ सुरू असलेले पश्चिम आशियातील युद्ध आणि मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या आर्थिक विकास तसेच महागाईवरील परिणामांबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. महागाईतील वाढीची जोखीम लक्षात घेऊन पतधोरण समिती व्याजदरात बदल करण्याबाबत प्रतीक्षा करण्याची भूमिका स्वीकारेल.- दिप्ती देशपांडे, प्रधान अर्थतज्ज्ञ, क्रिसिल

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत विकास दर ७.१ ते ७.३ टक्के राहणे अपेक्षित आहे. याच तिमाहीत किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या आसपास राहील. यामुळे पतधोरण समितीकडून व्याजदर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.डी.के.श्रीवास्तव, मुख्य धोरण सल्लागार, ईवाय इंडिया