RBI Plastic Notes India implementation details revealed by Governor Sanjay Malhotra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास, पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला भारतात प्लास्टिक नोटा चलनात येऊ शकतात. पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्होत्रा ​​म्हणाले की, रिझर्व्ह बँक १० आणि २० रुपयांच्या मूल्याच्या प्लास्टिक नोटा प्रायोगिक तत्त्वावर आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. “पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्या चलनात आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे आरबीआय गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

पॉलिमर नोटांच्या प्रत्यक्ष वापराच्या चाचण्या घेण्यास सरकारने आरबीआयला मंजुरी दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे एका अशा प्रस्तावाला पुन्हा चालना मिळाली आहे, ज्याची घोषणा दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी करण्यात आली होती, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

आरबीआय प्लास्टिक नोटा का आणत आहे?

आरबीआयच्या मते, प्लास्टिक नोटांमुळे कमी मूल्याच्या चलनी नोटांचा टिकाऊपणा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, कारण उच्च मूल्याच्या नोटांच्या तुलनेत या नोटांचा वापर आणि हस्तांतरण अधिक वारंवार होते.

यामागचे कारण स्पष्ट करताना मल्होत्रा ​​म्हणाले की, कमी मूल्याच्या नोटांचा वापर दैनंदिन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांचे आयुष्य खूपच कमी असते. “प्लास्टिकमुळे नोटांचा टिकाऊपणा आणि आयुष्ट वाढते. कमी मूल्याच्या नोटांच्या बाबतीत हे विशेषतः उपयुक्त आहे, कारण त्या चलनात वेगाने फिरत असतात आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी असते”, असे ते म्हणाले.

कापसापासून बनवलेल्या कागदावर छापल्या जाणाऱ्या पारंपरिक भारतीय चलनी नोटांच्या तुलनेत, प्लास्टिक नोटांची निर्मिती एका टिकाऊ प्लास्टिकच्या आधारावर केली जाते. हे साहित्य ओलावा, घाण आणि झीज यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते.

१० आणि २० रुपयांच्या नोटा या सर्वाधिक प्रमाणात वापरात असलेल्या चलनी नोटांपैकी असल्याने त्या लवकर खराब होतात आणि वारंवार बदलाव्या लागतात. प्लास्टिक नोटा चलनात बराच काळ टिकून राहतील आणि त्यामुळे कालांतराने त्या बदलण्याचा खर्च कमी होईल, अशी अपेक्षा आरबीआयला आहे.

चाचण्यांना सरकारची मंजुरी

गेल्या महिन्यात, केंद्र सरकारने प्लास्टिक नोटांच्या चाचण्यांसाठी १० रुपयांच्या १०० कोटी नोटा आणि २० रुपयांच्या १०० कोटी नोटा छापण्याच्या आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या नाटांच्या वापराचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, भारतीय हवामान आणि मोठ्या प्रमाणातील चलनात या नोटांची कामगिरी कशी होते, याचे मूल्यांकन या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे केले जाईल.