RBI Plastic Notes trial news and government approval: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) प्लास्टिक नोटांच्या प्रायोगिक चाचणीअंतर्गत १० रुपये आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १०० कोटी नोटा चलनात आणल्या जाणार आहेत आणि या नोटांचे एकूण मूल्य ३,००० कोटी रुपये असणार आहे. लोकसभेत नुकतेच एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली.

चौधरी यांनी सांगितले की, केंद्रीय मंडळाच्या शिफारशीनंतर आरबीआयने प्रत्यक्ष वापराच्या चाचण्या घेण्यासाठी आणि त्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर या दोन मूल्यांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे चलनात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली.

पंकज चौधरी यांनी पुढे सांगितले की, आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कागदी नोटांसोबतच या पॉलिमर नोटा चलनात आणण्याचा प्रस्ताव आहे आणि कागदी नोटा पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

१७ जुलै रोजी, आरबीआयची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने दोन मूल्यांच्या नोटा छापण्यासाठी ३.४ कोटी पॉलिमर शीट्सची जागतिक निविदा काढली होती. या निविदेत म्हटले होते की या शीट्स “तात्काळ आवश्यक” आहेत आणि क्षेत्रीय चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, “आम्ही विविध मूल्यांसाठी मोठ्या प्रमाणात सबस्ट्रेट खरेदी करण्याचा विचार करत आहोत”.

संख्येच्या दृष्टीने विचार करता, १० आणि २० रुपयांच्या नोटा एकूण चलनी नोटांपैकी जवळपास एक चतुर्थांश इतक्या आहेत. मात्र चलनात असलेल्या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये त्यांचा वाटा केवळ १.३% इतकाच आहे.

प्लास्टिकच्या नोटांचा प्रयोग करण्याचा आरबीआयचा हा दुसरा प्रयत्न आहे. सप्टेंबर २००९ मध्ये, आरबीआयने १० रुपयांच्या १०० कोटी नोटा छापण्यासाठी पॉलिमर शीट्स खरेदीच्या निविदा मागवल्या होत्या. या नोटांची प्रत्यक्ष चाचणी कोची, म्हैसूर, शिमला, जयपूर आणि भुवनेश्वर यांसारख्या विविध हवामान असलेल्या राज्यांमध्ये घेण्याचे नियोजित होते, जेणेकरून या नोटांची टिकाऊपणाची क्षमता तपासता येईल. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे या चाचण्यांमध्ये काहीच प्रगती झाली नाही.

“आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार, कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा जास्त वर्षे टिकतात, अशी माहिती आरबीआयने दिली होती. पॉलिमर नोटा आणण्याची प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे आणि डिजिटल पेमेंटवर त्यांचा काही परिणाम झाल्यास, तो या नोटांचे नियमित वितरण सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल. शिवाय, चलनी नोटा आणि डिजिटल पेमेंट प्रणाली ही जनतेसाठी उपलब्ध असलेली एकमेकांना पूरक अशी पेमेंटची साधने आहेत”, असे चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात पुढे नमूद केले.

सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामध्ये प्लिस्टिक नोटांचा वापर

१९८८ मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने चलनात आणलेल्या प्लास्टिकच्या नोटांचा वापर आता ५० हून अधिक देशांमध्ये केला जातो आणि त्या कागदी नोटांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक चांगल्या मानल्या जातात.