मुंबई: २००५ सालापूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील सर्व चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून १ जुलै २०१६ पासून या नोटा स्वीकारण्याची अथवा बदलून घेण्याची सुविधा सामान्य बँकांमध्ये बंद करण्यात आली आहे. आता अशी सोय केवळ रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल, असे मध्यवर्ती बँकेने आता पुन्हा ९ जून २०२६ रोजी देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना उद्देशून काढलेल्या परिपत्रकातून सूचित केले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या जुन्याच आदेशाला अनुसरून पावले टाकताना, बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाने १२ जून २०२६ रोजी एक अंतर्गत परिपत्रक जारी करून आपल्या सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालये आणि चलन पेढ्या अर्थात ‘करन्सी चेस्ट’ना २००५ पूर्वीच्या नोटांबाबत अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. १० वर्षांपूर्वीच्या नोटबंदीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या या फेर-परिपत्रकांच्या ‘जुन्याच पात्रात नवे पाणी ओतण्या’च्या उद्योगाने चांगलाच गोंधळ उडवून दिला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून ग्राहकांना उद्देशून समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या बनावट संदेशाने लोकांमध्ये आणखीच घबराटीचे वातावरण निर्माण केले. “२००५ पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील १०, २०, ५०, १०० रुपयांच्या नोटा बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये केवळ ३० जून २०२६ पर्यंतच स्वीकारल्या जातील,” असे या संदेशांत सूचित करण्यात आले होते. समाजमाध्यमांत शुक्रवारी पसरलेले हे पत्रक तथ्यहीन व चुकीचे असल्याचे बँकेने त्वरित स्पष्ट केले आहे. तथापि प्रथमतः रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर त्याला अनुसरून खुद्द बँक ऑफ महाराष्ट्रने अंतर्गत परिपत्रक काढण्याचे कारण काय, यावर मात्र बँकेच्या प्रवक्त्यांकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही.
नोटांवरील ‘महात्मा गांधी’ बाद?
रिझर्व्ह बँकेने १९९६ मध्ये पहिल्यांदा सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यास सुरुवात केली. या मालिकेला अधिकृतपणे ‘महात्मा गांधी मालिका’ (एमजी सीरिज) असे नाव दिले गेले. सध्या ज्या नोटांवर बँकांनी बंधन आणले आहे, त्या १९९६ ते २००५ या काळात छापलेल्या याच पहिल्या मालिकेतील नोटा आहेत. तथापि, २०१६ च्या नोटाबंदीनंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जी नवीन डिझाईन, रंग आणि आकारातील नोटांची मालिका आणली, तिला ‘महात्मा गांधी (न्यू) सिरीज’ असे नाव देण्यात आले. २००५ नंतर छापलेल्या नोटांच्या मागील बाजूच्या तळाशी छपाईचे वर्ष स्पष्टपणे छापलेले असते, त्यावरून ग्राहकांना या दोन वेगवेगळ्या मालिकांतील नोटा ओळखता येतील.
बँकांना उद्देशून असलेल्या परिपत्रकात रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये अद्ययावत ठेवण्यासाठी जुन्या नोटा चलनातून बाद केल्या जात आहेत. यासाठी बँकांनी निर्देशित नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तथापि १० वर्षांआधीच बँकांच्या खिडकीवर स्वीकारणे बंद झालेल्या आणि चलनी वापर हळूहळू जवळपास बंद झालेल्या या नोटांबाबत आता पुन्हा मध्यवर्ती बँकेचे परिपत्रक येणे हे एक कोडेच आहे. शिवाय बँकांनी कोणत्याही परिस्थितीत २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा ग्राहकांना एटीएमद्वारे किंवा बँकेच्या खिडकीवरून पुन्हा चलनात वापरात आणण्यासाठी देऊ नयेत, असेही फर्मानही त्यात आहे.
परिपत्रकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने निश्चलनीकरण अर्थात नोटाबंदीदरम्यान रद्द केलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वगळता, इतर सर्व २००५ पूर्वीच्या जुन्या नोटांना अजूनही कायदेशीर चलन असाच दर्जा असेल. म्हणजेच त्यांचे कायदेशीर मूल्य अद्याप संपलेले नाही.
