RCB Revenue and Operating Profit: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने काल गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. मागील वर्षी आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करत १८ वर्षांत पहिल्यांदा आयपीएल जिंकली होती. मैदानावर दमदार कामगिरी केलेल्या आरसीबीला आयपीएलच्या या हंगामातून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या हंगामात आरसीबीला अंदाजित ७५८ कोटी रुपयांच्या एकूण महसुलावर आधारित ४०० कोटींहून अधिक रुपयांचा परिचालन नफा (Operating profit) मिळण्याची शक्यता आहे.
आदित्य बिर्ला समूह आणि ब्लॅकस्टोन यांच्या नेतृत्वाखालील एका समूहाने नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालकी हक्क संपादन केले आहेत. यासाठी त्यांनी आरसीबीच्या आधीच्या मालकांना तब्बल १६,६६० कोटी रुपये मोजले आहेत.
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावल्यामुळे त्यांच्या ‘ब्रँड’ची ताकद आणखी वाढली आहे. असे असले तरी, तरी यामागील खरी गोष्ट मात्र ‘रोख प्रवाहा’ची (Cash Flow) आहे. प्रामुख्याने सुरक्षित महसूल आणि खर्चावरील मर्यादांमुळे वर्षाकाठी ४०० कोटींहून अधिक नफा कमावणारी ही फ्रँचायझी, आता ‘अब्ज-डॉलर’ मूल्यांकनाचा आधार बनली आहे. तसेच, सध्या आयपीएल संघांचे मूल्यांकन कशा प्रकारे केले जात आहे, यासाठी ती एक आदर्श नमुना ठरली आहे.
महसुलाचे स्त्रोत
आरसीबीला मिळणाऱ्या महसुलाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे ‘सेंट्रल पूल’मधून मिळणारा वाटा. आरसीबीच्या बाबतीत, यामध्ये प्रसारणाचे हक्क (Media Rights) आणि केंद्रीय प्रायोजकत्वामधून मिळणारे अनुक्रमे सुमारे ४५० कोटी व ६० कोटी रुपये यांचा समावेश आहे. ज्यामुळे केंद्रीय स्रोतांतून मिळणारी एकूण रक्कम साधारणपणे ५१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. केवळ हीच रक्कम या हंगामासाठी फ्रँचायझीच्या कमाईचा मुख्य आधार ठरली आहे.
याव्यतिरिक्त, संघाशी संबंधित महसूल एकूण उत्पन्नात मोठी भर घालतो. मुख्य जर्सी करार (‘Nothing’ सोबतचा) आणि इतर भागीदारींसह मिळून, स्थानिक प्रायोजकत्वांतून अंदाजे १६५ कोटी रुपयांचे योगदान मिळते. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सात घरच्या मैदानावरच्या सामन्यांतून मिळणारे ‘मॅच-डे’ उत्पन्न सुमारे ४५ कोटी रुपये इतके असल्याचा अंदाज आहे. तर ‘मर्चंडाईज’ (संघाशी संबंधित वस्तूंची विक्री) आणि परवाना शुल्कातून आणखी २५ कोटी रुपयांची भर पडते. तसेच संघाला जेतेपद पटकावल्याबद्दल बक्षीस रकमेतून सुमारे २० कोटी रुपयांचे मिळते आहेत. यामुळे एकूण महसूल सुमारे ७६५ कोटींवर गेला आहे.
खर्च
आरसीबी सर्व खेळाडूंना वेतन म्हणून १२४.८ कोटी रुपये देते. याव्यतिरिक्त, सामन्यांच्या शुल्कापोटी (Match fees) आणखी १२.६ कोटी रुपये खर्च होतो. खर्चातील सर्वात मोठा वाटा हा बीसीसीआयला द्याव्या लागणाऱ्या हिश्श्याचा असून, तो अंदाजे १५१.६ कोटी रुपये किंवा एकूण महसुलाच्या साधारणपणे २० टक्के इतका आहे. प्रशिक्षक, प्रवास, मार्केटिंग आणि स्टेडियम शुल्क यांसह इतर परिचालन खर्चांची एकूण बेरीज सुमारे ६०-६५ कोटी रुपये होते. यामुळे एकूण खर्च साधारणपणे ३५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो.
आरसीबीला मिळणारा नफा
महसूल आणि खर्च यांच्यात असलेला अंदाजे ४०५ कोटी रुपयांचा फरक हा आरसीबीला मिळणारा नफा आहे. हा नफा जगातील बहुतांश क्रीडा संघांच्या तुलनेत खूप मोठा आहे. इतकेच नव्हे, तर आयपीएल फ्रँचायझींमध्ये साधारणपणे दिसून येणाऱ्या ३७-४० टक्के नफ्याच्या प्रमाणापेक्षाही तो जास्त आहे.
