मुंबई : भारतातील पाच सूचिबद्ध ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स’नी ( रिट्स) ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ४.२५ लाखांहून अधिक   गुंतवणूकदारांना एकत्रितपणे  २,५६६ कोटींहून अधिक रक्कम वितरित केली आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५-२६ चा विचार करता, या पाचही रिट्सद्वारे करण्यात आलेले एकूण वितरण ८,९०० कोटींहून अधिक राहिले असून, यामध्ये वार्षिक ५० टक्क्यांहून अधिक दमदार वाढ नोंदवली गेली आहे.

भारतात सध्या ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बसि ऑफिस पार्क रिट्स, नॉलेज रिअल्टी ट्रस्ट, माईंडस्पेस बिझनेस पार्क्स रिट्स आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट हे पाच रिट्स सूचिबद्ध आहेत. चालू आर्थिक वर्षात एका नवीन रिट्सचा समावेश झाल्याने ही संख्या पाचवर पोहोचली आहे.

बाजार भांडवल १.७० लाख कोटींवर

आर्थिक वर्ष २६ च्या चौथ्या तिमाहीच्या अखेरीस, भारतीय रिट्स बाजाराचे एकूण स्थूल मालमत्ता मूल्य २ लाख ७२ हजार कोटींच्या वर गेले आहे. तसेच, २२ मे २०२६ पर्यंत या क्षेत्राचे एकत्रित बाजार भांडवल १ लाख ७० हजार कोटींहून अधिक नोंदवले गेले. हे पाचही रिट्स मिळून संपूर्ण भारतात तब्बल १८७ दशलक्ष चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावरील ‘ग्रेड ए’ दर्जाच्या कार्यालयीन आणि रिटेल रिअल इस्टेट मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहेत.

भारतीय रिट्स उद्योगासाठी हे आणखी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे. वितरणातील वेगाने झालेली वाढ, उच्च-गुणवत्तेच्या पोर्टफोलिओचा विस्तार आणि गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग ही या वर्षाची वैशिष्ट्ये आहेत. ८,९०० कोटी रुपयांहून अधिकची एकूण वितरण रक्कम ही ५० टक्क्यांची वार्षिक वाढ दर्शवते, ज्यातून या क्षेत्राची स्थिर परतावा देण्याची क्षमता अधोरेखित होते, असे इंडियन रिट्स असोसिएशनचे अध्यक्ष आलोक अग्रवाल म्हणाले.

गुंतवणुकीचे पसंतीचे माध्यम

स्थापनेपासून आतापर्यंत या ट्रस्ट्सनी युनिटधारकांना एकत्रितपणे ३१,७०० कोटींहून अधिक रक्कम वितरित केली असून, भारतातील भांडवली बाजार परिसंस्थेमध्ये त्यांचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. पारदर्शक व्यवस्थापन आणि नियमित उत्पन्नाच्या सुलभतेमुळे स्थानिक आणि जागतिक गुंतवणूकदारांचा कल रिट्सकडे सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ‘इंडियन रिट्स असोसिएशन’ ही ना-नफा तत्त्वावरील संस्था या क्षेत्राच्या विकासासाठी आणि दीर्घकालीन वाढीसाठी कटिबद्ध असून, पाचही सूचिबद्ध रिट्स याचे सक्रिय सदस्य आहेत.

रिअल इस्टेटमधील ‘म्युच्युअल फंड’ म्हणजे ‘रिट्स’ 

 जर तुम्हाला एखाद्या मोठ्या कमर्शियल मॉलमध्ये, आयटी पार्कमध्ये किंवा ऑफिस स्पेसमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज असते. पण ‘रिट्स’मुळे  अगदी काही हजारांत अशा मोठ्या मालमत्तांचे भागधारक बनता येते.

‘रिट्स’ कसे काम करते? 

१. निधी गोळा करणे: रिट्स कंपन्या बाजारात आपले युनिट्स जारी करून हजारो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात.

२. मालमत्ता खरेदी: या पैशांतून त्या नामांकित आणि ‘ग्रेड ए’ दर्जाच्या व्यावसायिक इमारती, आयटी पार्क, मॉल्स खरेदी करतात किंवा भाड्याने घेतात.

३. भाड्याने देणे: या मोठ्या मालमत्ता विविध नामांकित कंपन्यांना आणि कॉर्पोरेट कार्यालयांना भाड्याने दिल्या जातात.

४. नफा वाटप: या मालमत्तांमधून जे भाडे (Rent) गोळा होते, त्यातून होणाऱ्या नफ्याचा मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना लाभांश (Dividend) किंवा व्याज स्वरूपात वाटला जातो.

गुंतवणूकदारांना ‘रिट्स’चे मुख्य फायदे:

नियमित उत्पन्न (Regular Income): सेबीच्या नियमांनुसार, रिट्स कंपन्यांना आपल्या कमाईतील सुमारे ९० टक्क्यांपर्यंत नफा गुंतवणूकदारांना नियमितपणे वितरित करावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो.

कमी भांडवलात गुंतवणूक: प्रत्यक्ष जमीन किंवा दुकान खरेदी करण्यासाठी लाखो-कोट्यवधी रुपये लागतात. मात्र, रिट्सचे युनिट्स तुम्ही शेअर बाजारातून थेट अगदी कमी पैशात खरेदी करू शकता.

उच्च पारदर्शकता आणि सुरक्षा: सर्व सूचिबद्ध रिट्सचे नियंत्रण बाजार नियामक ‘सेबी’द्वारे केले जाते. त्यामुळे यात फसवणुकीची भीती नसते आणि व्यवस्थापन अत्यंत पारदर्शक असते.

लिक्विडिटी (पैसे काढण्याची सोय): प्रत्यक्ष घर किंवा जमीन विकायला महिने लागतात. पण रिट्सचे युनिट्स शेअर बाजारात सूचिबद्ध असल्याने, तुम्ही ते कधीही विकून आपले पैसे तात्काळ मोकळे करू शकता.

भारतात सध्या कोणते ‘रिट्स’ उपलब्ध आहेत?

भारतात सध्या खालील प्रमुख रिट्स शेअर बाजारात सूचिबद्ध (Listed) आहेत:

ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट (Brookfield India Real Estate Trust)

एम्बसी ऑफिस पार्क्स रिट्स (Embassy Office Parks REIT)

माईंडस्पेस बिझनेस पार्क्स रिट्स (Mindspace Business Parks REIT)

नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट (Nexus Select Trust – हा प्रामुख्याने मॉल्सच्या मालमत्तेवर केंद्रित आहे)

नॉलेज रिअल्टी ट्रस्ट (Knowledge Realty Trust)