Anant Ambani On Energy Insecurity: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत भाषण करताना रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ आयपीओची घोषणा करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारताने ऊर्जा असुरक्षिततेच्या विळख्यात कधीही अडकणार नाही याची खात्री केली पाहिजे. देशाचे आयातीत ऊर्जेवरील (कच्चे तेल) अवलंबित्व कमी करण्यासाठी मुकेश अंबानी यांनी सौर, पवन, बॅटरी, हायड्रोजन, कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि अंडरग्राऊंड कोल गॅसिफिकेशन यांचा समावेश असलेल्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची रूपरेषा मांडली.

या सभेत मुकेश अंबानी यांनी नमूद केले की, देश जवळपास ७० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे भू-राजकीय तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा तत्काळ परिणाम होतो.

“भारताचे भविष्य कधीही ऊर्जा असुरक्षिततेच्या ओझ्याखाली अडकून पडणार नाही, याची खात्री करणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. भारताला आवश्यक असलेली जवळपास सर्व प्रकारची इंधने मुबलक प्रमाणात, तसेच अत्यंत किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण करणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे”, असे ते म्हणाले.

गॅस तुटवड्यात रिलायन्सची कामगिरी

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या व्यत्ययाच्या काळात कंपनीने बजावलेल्या भूमिकेवर कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी प्रकाश टाकला.

“जेव्हा पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलएनजी पुरवठ्यात व्यत्यय आला, तेव्हा रिलायन्सने आपला देशांतर्गत गॅस शहरांमधील गॅस वितरण, खते आणि वीज निर्मिती यांसारख्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांकडे त्वरित वळवला. देशाला जेव्हा सर्वाधिक गरज होती, तेव्हा रिलायन्सने ती गरज पूर्ण केली”, असे अनंत अंबानी म्हणाले.

अनंत अंबानी यांनी रिलायन्सच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीचा आढावा देखील सादर केला. कच्छमधील ५,५०,००० एकर क्षेत्रावर पसरलेल्या कंपनीच्या अक्षय ऊर्जा केंद्रातून दरवर्षी ४० अब्ज युनिट्सपेक्षा जास्त हरित ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. हे प्रमाण भारताच्या वार्षिक वीज गरजेच्या सुमारे ३% इतके आहे.

त्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत दररोज ५५ मेगावॅट क्षमतेचे सौर मॉड्यूल्स आणि १५० मेगावॅट-अवर क्षमतेचे बॅटरी कंटेनर्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑइल-टू-केमिकल्स व्यवसायात रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२६ साठी ६,६२,४०१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो ५.७% वाढ दर्शवतो.