Anant Ambani Reliance Director : देशातील अग्रगण्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भावी नेतृत्वाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या कंपनीच्या पूर्णवेळ कार्यकारी संचालक पदावरील नियुक्तीला रिलायन्सच्या भागधारकांनी प्रचंड बहुमताने मंजुरी दिली आहे. कंपनीने रविवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, अनंत अंबानी यांच्या नियुक्तीच्या बाजूने तब्बल ९४.४ टक्के मतदारांनी कौल दिला आहे. या मोठ्या पाठिंब्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांच्या वयावरून आणि अनुभवावरून कॉर्पोरेट जगतात सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सर्वात तरुण पूर्णवेळ संचालक
कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यवसायची सुत्रे हळूहळू पुढच्या पिढीकडे देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी आकाश आणि ईशा अंबानी यांना समुहात महत्त्वाची पदे देण्यात आली आहे. आता अनंद अंबानी यांच्या रुपाने रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वात तरुण पूर्णवेळ संचालक मिळाले आहेत. अनंत अंबानी यांची १ मे २०२५ पासून पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी रिलायन्सच्या बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. अमेरिकेतील नामांकित ‘ब्राऊन विद्यापीठा’मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
अनंत अंबानी प्राणीप्रेमासाठी प्रसिद्ध
अनंत अंबानी हे त्यांच्या प्राणीप्रेमासाठी ओळखले जातात. धोक्यात आलेल्या प्राण्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना योग्य काळजी व सन्मान मिळवून देणे, यांसारख्या सेवाभावी उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन ‘ग्लोबल ह्युमन सोसायटी’ने त्यांना ‘ग्लोबल ह्युमनिटेरियन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित केले होते. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत.
वंतारा उभारण्यासाठी प्रसिद्ध
अनंत अंबानी यांनी रिलायन्स समुहाच्या जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी यांसारख्या अनेक आघाडीच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम केले आहे. याशिवाय, सप्टेंबर २०२२ पासून ते रिलायन्स फाऊंडेशनच्या बोर्डाचे सदस्यही आहेत. मात्र, त्यांची सर्वात मोठी आणि उल्लेखनीय ओळख म्हणजे गुजरात मधील जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेले ‘वंतारा’ हे ३,००० एकरांवरील भव्य वन्यजीव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र होय. दुसरीकडे, त्यांचे थोरले बंधू आकाश अंबानी हे सध्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत, तर बहीण ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या कार्यकारी संचालक म्हणून धुरा सांभाळत आहेत. हे दोघेही रिलायन्सच्या मुख्य बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
अनंत अंबानींच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह
रिलायन्सच्या संचालक मंडळावर अनंत अंबानी यांची नियुक्ती केल्यानंतर जागतिक स्तरावक टीकेचा सूर होता. २०२३ मध्ये आयएसएस या आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी ॲडव्हायझरी फर्मने भागधारकांना अनंत यांच्या नियुक्तीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. अनंत यांच्याकडे असलेला सुमारे ६ वर्षांचा मर्यादित संचालक अनुभव बोर्डातील त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असे मत ब्लूमबर्ग न्यूजच्या अहवालानुसार आयएसएसने मांडले होते. मात्र, त्याच वेळी त्यांनी आकाश आणि ईशा अंबानी यांच्या नियुक्तीचे समर्थन केले होते.
याउलट, ‘ग्लास लुईस’ या दुसऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रॉक्सी फर्मने अनंत अंबानी यांच्या नियुक्तीची बाजू घेतली होती. आम्ही अनुभवाच्या बाबतीत अनंत यांना त्यांच्या इतर भावंडांपेक्षा वेगळे मानत नाही, असे म्हटले होते. अखेर जागतिक कंपन्यांमधील या मतमतांतरांना बाजूला सारत रिलायन्सच्या ९४ टक्क्यांहून अधिक भागधारकांनी मुकेश अंबानी यांच्या तरुण वारसावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. त्यामुळे अनंत अंबानी यांच्या नियुक्तीवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
