वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अमेरिकेने देशातील आघाडीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला थेट व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. तेल वितरक कंपन्यांसाठी असलेल्या निर्बंधांचे उल्लंघन न करता तेल आयात करता येणे शक्य आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले.

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर, अमेरिकी अधिकाऱ्यांनी व्हेनेझुएलाच्या ऊर्जा उद्योगावर लादलेले निर्बंध कमी करून २ अब्ज डॉलरचा तेल पुरवठा करार आणि देशाच्या तेल उद्योगासाठी १०० अब्ज डॉलरचा महत्त्वाकांक्षी पुनर्बांधणी योजना आखली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजला देण्यात आलेल्या सामान्य परवान्याअंतर्गत व्हेनेझुएलाच्या मूळ तेलाची खरेदी, निर्यात आणि विक्री करता येणे शक्य आहे.
रिलायन्सला परवाना दिल्याने व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीला गती मिळू शकते आणि रिलायन्सचा देखील खनिज तेल आयातीचा खर्च कमी होऊ शकतो.

जानेवारीच्या सुरुवातीला परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या रिलायन्सने यावर प्रतिसाद दिलेला नाही.

रशियन तेलाची जागा घेणार व्हेनेझुएलाचे तेल

या महिन्याच्या सुरुवातीला, रिलायन्सने विटोलकडून व्हेनेझुएलाचे २० लाख बॅरल तेल खरेदी केले, ज्याला मादुरोच्या ताब्यात आल्यानंतर ट्रॅफिगुरासह अमेरिकेने लाखो बॅरल व्हेनेझुएलाचे तेल बाजारात आणण्यासाठी आणि विकण्यासाठी परवाने दिले आहेत. व्हेनेझुएलाच्या तेलाची थेट खरेदी रिलायन्सला किफायतशीर मार्गाने रशियन तेलाची जागा घेण्यास मदत करेल, कारण कराकसमधून येणारे खनिज तेल सवलतीत विकले जाते, असे एका सूत्राने सांगितले.

रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या बोलीवर या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २५ टक्के दंडात्मक शुल्क काढून टाकले. अमेरिकेकडून आणि संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रिलायन्ससह इतर भारतीय कंपन्या आता नव्याने रशियन तेल खरेदी टाळत आहेत. जेणेकरून अमेरिकेसह व्यापार करार करण्यास मदत होऊ शकते. याआधी देखील रिलायन्सने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी केली आहे. मात्र २०२५ च्या सुरुवातीला अमेरिकेच्या निर्बंधांमुळे त्यांना खरेदी थांबवावी लागली. रिलायन्स दररोज सुमारे १.४ दशलक्ष पिंप क्षमतेच्या दोन तेलशुद्धीकरण प्रकल्प चालवते.