पीटीआय, वॉशिंग्टन

देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकेतील टेक्सासमध्ये प्रस्तावित नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करून भागीदारी करेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जाहीर केले.

कराराबद्दल कंपनी आणि भारतातील भागीदारांचे आभार मानत ट्रम्प यांनी मंगळवारी समाजमाध्यमावर हा प्रकल्प त्यांच्या प्रशासनाच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा भाग असल्याचे नमूद केले. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि अमेरिकेच्या कामगारांसाठी, ऊर्जा क्षेत्रासाठी आणि दक्षिण टेक्सासमधील लोकांचा हा विजय आहे, असे ट्रम्प म्हणाले. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

ब्राउन्सव्हिले बंदरातील नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प अमेरिकी बाजारपेठांना इंधन पुरवेल. यामुळे अमेरिकेतील ऊर्जा उत्पादन वाढण्याबरोबरच हजारो रोजगार निर्माण होतील, असे ट्रम्प म्हणाले. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे.

या संबंधाने अमेरिका फर्स्ट रिफायनिंग (एएफआर) या कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, रिलायन्सचे नाव अधिकृतपणे घेतलेले नाही. मात्र, जागतिक ऊर्जा बाजारात रिलायन्स ही एक जागतिक महत्त्वाची कंपनी मानली जाते. रिलायन्सने यापूर्वीही अमेरिकेतील शेल ऑईल अर्थात तेथील खडकांमधून मिळविल्या पाषाण तेलाच्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. बाजारपेठेत अशी चर्चा आहे की, ही रिलायन्सकडून किमान ‘नऊ अंकी’ साधारण १०० दशलक्ष डॉलर (सुमारे ८३० कोटी रुपये) गुंतवणूक होऊ घातली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत ती गोपनीय ठेवली जाईल.

प्रस्तावित प्रकल्प पूर्णपणे अमेरिकी शेल ऑईलवर आधारित असेल. त्यात गुंतवणूक करणाऱ्या कंपनीने पुढील २० वर्षांसाठी या प्रकल्पातून तयार होणारे तेल किंवा ऊर्जा विकत घेण्याचे, त्यावर प्रक्रिया करण्याचे आणि वितरणाचे कायदेशीर बंधन स्वीकारले आहे, असे एएफआरने स्पष्ट केले आहे.

या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग १.३२ टक्क्यांच्या घसरणीसह १,३९०.२० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजार भावानुसार, कंपनीचे १८.८१ लाख कोटींचे बाजार भांडवल आहे.