पीटीआय, नवी दिल्ली : इराण-अमेरिका युद्धामुळे विस्कळीत झालेल्या परिस्थितीमुळे महागाईने पुन्हा डोके वर काढले असून देशातील किरकोळ महागाईचा दर (सीपीआय) मे महिन्यात ३.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या मध्यम-मुदतीच्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ पोहोचला आहे. एप्रिलमधील ३.४८ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, किरकोळ महागाईत सलग पाचव्या महिन्यात वाढ नोंदवली गेली असून यंदाच्या वर्षातील हा सर्वात मोठा मासिक वाढीचा टप्पा ठरला आहे.

जानेवारीमध्ये महागाईचा दर २.७४ टक्के होता. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा सलग पाच महिन्यांत महागाईचा चढता क्रम कायम आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला दिसणारा किंमतींवरील दबाव कमी होण्याचा कल आता विरुद्ध दिशेने प्रवास करत आहे. अन्नपदार्थ आणि इंधनामुळे निर्माण होणारे महागाई वाढीचे धोके आता ग्राहक किंमतींवर परिणाम करू लागले आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे ‘आयातित महागाई’बाबत चिंता वाढली आहे.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील सातत्यपूर्ण भू-राजकीय तणावामुळे आयातीत महागाईचा धोका वाढला आहे. इंधनाच्या किमतीतील वाढीचा परिणाम वाहतूक आणि उत्पादन खर्चावर होत असून त्याचे पडसाद ग्राहकांच्या खिशावर उमटू लागले आहेत. त्याचबरोबर हवामानातील अनिश्चितता आणि अन्नधान्याच्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अन्नमहागाईचाही दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

महागाईतील या वाढीमुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीसमोर (एमपीसी) नवे आव्हान उभे राहू शकते. अनेक अर्थतज्ज्ञांनी चालू आर्थिक वर्षात व्याजदरात २५ ते ५० आधार बिंदूपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जर खनिज तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या आणि एल-निनोचा प्रभाव वाढून अन्नधान्य उत्पादनावर परिणाम झाला, तर महागाईचा दर ५ टक्क्यांचाही टप्पा ओलांडू शकतो, असा इशाराही विश्लेषकांनी दिला आहे.

महागाई अद्याप नियंत्रणाच्या चौकटीत असली तरी सलग पाच महिन्यांपासून सुरू असलेली वाढ ही धोरणकर्त्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे आगामी महिन्यांतील महागाईचे आकडे आणि रिझर्व्ह बँकेची भूमिका याकडे बाजार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे महागाईत वाढ

मे महिन्यात अन्न आणि पेये यांच्या महागाईचा दर ४.५५ टक्के होता, ज्यामध्ये केवळ अन्नपदार्थांचा महागाई दर ४.७८ टक्के नोंदवला गेला. शहरी भागातील ४.६६ टक्क्यांच्या तुलनेत ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईचा दर अधिक, म्हणजेच ४.८५ टक्के राहिला. खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोच्या किमती हा चिंतेचा मुख्य विषय ठरला; एप्रिलमधील ३५.२६ टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात टोमॅटोचा महागाई दर ४८.४३ टक्के होता. आल्याच्या महागाईचा दर ३२.४९ टक्क्यांपर्यंत वाढला, तर प्रमुख वस्तूंमध्ये चांदीच्या दागिन्यांच्या महागाईचा दर सर्वाधिक, म्हणजेच १५५.२३ टक्के नोंदवला गेला. त्याच वेळी, काही वस्तूंच्या किमतीत घट होण्याचे सत्र सुरूच राहिले. बटाट्याच्या महागाईचा दर -२३.७१ टक्के (ऋण) राहिला, तर मटारच्या महागाईचा दर -११.४७ टक्के नोंदवला गेला.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महागाई अधिक

एकूण महागाई दरातील वाढ ग्रामीण भारतात अधिक स्पष्टपणे दिसून आली. मे महिन्यात ग्रामीण भागातील किरकोळ महागाई दर ४.२५ टक्के होता, तर शहरी भागात तो ३.५३ टक्के होता. एप्रिलमध्ये ग्रामीण आणि शहरी महागाई दर अनुक्रमे ३.७४ टक्के आणि ३.१६ टक्के इतके होते.