RG Chandramogan Hatsun Agro products inspirational success story and net worth: आर. जी. चंद्रमोगन हे नाव आज फक्त तमिळनाडूतच नव्हे, तर देशभरात ओळखले जाते. त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून ओळख मिळवून देण्यामागे आहे तब्बल २०,००० कोटी रुपयांचे मूल्य असलेली आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी डेअरी कंपनी ‘हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट्स’. या डेअरी कंपनीचे एवढे मोठे साम्राज्य उभे करण्यासाठी आर. जी. चंद्रमोगन यांच्याकडे ना कोणती मोठी शैक्षणिक पदवी होती, ना कोणता मोठा वारसा किंवा वडिलोपार्जित संपत्ती. त्यांच्याकडे होती फक्त जिद्द आणि चिकाटी. दरमहा अवघ्या ६५ रुपये पगारावर पहिल्या नोकरीची सुरुवात आणि पुढे आईस्क्रीम विक्री करत आर. जी. चंद्रमोगन यांनी आज २००० कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंत घेतलेली झेप अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
गणितात नापास
चंद्रमोगन तमिळनाडूतील एका छोट्या खेड्यातील सामान्य कुटुंबात जन्मले आहेत. पुढे त्यांचे वडील चेन्नईला स्थायिक झाले आणि १९५६ मध्ये त्यांनी शहरात किराणा मालाचे दुकान सुरू केले. मात्र, अवघ्या १२ वर्षांतच म्हणजे १९६८ पर्यंत हा व्यवसाय बुडाला आणि चंद्रमोगन यांच्या कुटुंबाला रिकाम्या हातांनी आपल्या मूळ गावी परतावे लागले. व्यवसायातील कठोर वास्तवाचा चंद्रमोगन यांना आलेला हा पहिलाच अनुभव होता.
शिक्षणाच्या बाबतीत चंद्रमोगन यांची कामगिरी काही समाधानकारक नव्हती. शालेय शिक्षणानंतर त्यांनी पालयमकोट्टई येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण ते गणितात नापास झाले. यानंतर त्यांच्या वडिलांनी चंद्रमोगन यांना चेन्नईपासून सुमारे १६० किलोमीटर असलेल्या विल्लुपुरममधील एका लाकडाच्या डेपोत शिकाऊ कामगार म्हणून नोकरीसाठी पाठवले. तेव्हा त्यांचा पगार दरमहा केवळ ६५ रुपये इतका होता. तिथे त्यांनी एक वर्ष काम केले.
शेती विकून व्यवसायाला सुरुवात
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या निश्चयाने एका वर्षाने चंद्रमोगन चेन्नईला परत आले. चेन्नईला परतल्यानंतर त्यांनी एक व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना त्यांच्या वडिलांनी आपली शेती विकून १३ हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले.
वडिलांनी दिलेल्या या १३ हजार रुपयांच्या भांडवलाच्या जोरावर चंद्रमोगन यांनी १९७० मध्ये आईस्क्रीम निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आणि याला ‘अरुण’ असे नाव दिले. या व्यवसायासाठी त्यांनी चेन्नईतील रोयापुरम भागात २५० चौरस फुटांची एक जागा भाड्याने घेतली. यासाठी त्यांनी एक बर्फ बनवण्याचे यंत्र विकत घेतले आणि चार कर्मचारी कामावर ठेवले.
हा व्यवसाय फारसा नफा मिळवून देणारा किंवा आकर्षक नव्हता. त्या कारखान्यातून ते दररोज १०,००० आईस्क्रीमचे उत्पादन घेऊ लागले आणि स्वतःच याची विक्री करू लागले. याची विक्री करण्यासाठी चंद्रमोगन अनेकदा चेन्नईच्या रस्त्यांवरून हातगाडी ढकलत फिरत असत.
हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट्सची सुरुवात
पुढील काही वर्षे चंद्रमोगन यांनी आईस्क्रीमच्या व्यवसायासह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाचा अभ्यास केला आणि १९८० च्या दशकात त्यांनी दुधावर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. यातून आईस कँडीचा कारखाना एका डेअरी प्लांटमध्ये विकसित झाला. त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये लोणी, तूप आणि दही यांचा समावेश केला. यामुळे ‘अरुण’ या आईस्क्रीम ब्रँडचे रूपांतर घरोघरी लागणाऱ्या गरजेच्या वस्तूमध्ये झाले. हा प्रवास संथ आणि खडतर होता. पण संयम आणि धोरणात्मक नियोजनामुळे चंद्रमोगन यांना अखेर फळ मिळाले.
एकूण संपत्ती सुमारे १३.७६ हजार कोटी रुपये
आज त्यांची ‘हॅट्सन ॲग्रो प्रॉडक्ट्स’ ही शेअर बाजारात सूचीबद्ध कंपनी आहे. जुलै २०२६ पर्यंत, कंपनीचे बाजार भांडवल २०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ‘फोर्ब्स’च्या माहितीनुसार, चंद्रमोगन यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे १३,७६० हजार कोटी रुपयांची आहे.
