Robert Kiyosaki Net Worth : ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी आपल्या अर्थविषयक धड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कियोसाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती आणि ‘पॅसिव्ह इन्कम’चे नेहमी सल्ले देतात. त्यांची आतापर्यंत अनेक भाकीतं खरीही ठरली आहेत. वर्षभरापूर्वी त्यांनी चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर चांदीने थेट ४ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला होता. शेअर बाजाराच्या घसरणीत कियोसाकी यांनी आता सोने-चांदी आणि बिटकॉइनवर डाव लावण्यास सांगितले. पण, जगाला गुंतवणुकीचे ज्ञान देणारे रॉबर्ट स्वतः काय करतात माहिती आहे का?

रॉबर्ट कियोसाकी यांची एकूण संपत्ती किती?

‘सेलिब्रिटी नेट वर्थ’च्या अहवालानुसार रॉबर्ट कियोसाकी यांची एकूण संपत्ती १० कोटी डॉलर्स (सुमारे ८३० कोटी रुपये) आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत फारसा बदल झालेला नाही. इतर बड्या जागतिक गुंतवणूकदारांच्या तुलनेत कियोसाकी यांची संपत्तीतील वाढ संथ गतीने आहे.

कियोसाकी यांच्या उत्पन्नाचे साधन काय?

कियोसाकी यांचे १९९७ मध्ये प्रकाशित झालेले त्यांचे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गाजले आणि त्यातूनच ‘रिच डॅड’ या ब्रँड अंतर्गत पुस्तकांची एक मालिकाच सुरू झाली. यातून आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणूक, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जातात. या पुस्तकातून त्यांना सातत्याने मोठी रॉयल्टी मिळते. याशिवाय त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्थसाक्षरता सेमिनार आणि कोर्सेसमधून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होतो. कियोसाकी यांनी स्वतः जाहीर केल्यानुसार, त्यांची रिअल इस्टेट, सोने-चांदी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांचा २०२६ चा इशारा

कियोसाकी यांच्या मते, शेअर्सचे ओव्हर व्हॅल्यूएशन, डॉलरचे घसरणारे मूल्य आणि वाढते जागतिक कर्ज यामुळे २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळू शकते. कियोसाकी यांनी गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा चांदीला अधिक पसंती दिली आहे. त्यांच्या मते, औद्योगिक मागणी आणि दुर्मिळतेमुळे चांदी ही भविष्यात अधिक फायदेशीर ठरेल. २०२६ साठी त्यांनी चांदीचे सुधारित लक्ष्य प्रति औंस २०० डॉलर इतके निश्चित केले आहे, तर सोन्यासाठी प्रति औंस २७,००० डॉलरचा अंदाज वर्तवला आहे.

२०२५ मधील अंदाज खरा ठरला

यापूर्वी कियोसाकी यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये, असा अंदाज वर्तवला होता की २०२६ मध्ये चांदीचे दर १०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचतील. या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा अंदाज खरा ठरला. कियोसाकी यांनी चांदीच्या दरांचे आपले उद्दिष्ट पुन्हा वाढवून २०२६ सालासाठी २०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत, तर सोन्यासाठी २७,००० डॉलर्स प्रति औंसपर्यंत निश्चित केले होते.