Robert Kiyosaki Debt Strategy: जगप्रसिद्ध ‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सुमारे १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. त्यांच्या मते, ही रक्कम रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीशी संबंधित आहे असून, कर्ज हा त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या धोरणाचा एक मुख्य भाग आहे.

कियोसाकी यांनी अनेकदा उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्जाचा वापर करण्याबद्दल भाष्य केले आहे. श्रीमंत गुंतवणूकदार याच मार्गाने आपली संपत्ती उभी करतात, असा युक्तिवाद ते करतात. अलीकडेच ‘गेट रिच एज्युकेशन’ या पॉडकास्टवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा या मोठ्या आकड्याचा उल्लेख केला.

“माझ्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे,” असे कियोसाकी यांनी पॉडकास्टवर सांगितले. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांना आपल्या कार्यपद्धतीचे आंधळेपणाने अनुकरण न करण्याचा इशारा दिला. “पण मी १९७४ पासून याचा अभ्यास केला आहे… जर तुम्हाला कर्जाचा वापर करायला शिकायचे असेल, तर त्याबद्दल योग्य शिक्षण घेणे गरजेचे आहे”, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान कियोसाकी यांची माजी पत्नी आणि व्यावसायिक भागीदार, किम कियोसाकी यांनी १.२ अब्ज डॉलर्सच्या या आकड्याबाबत महत्त्वाची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे.

व्हॅनिटी फेअर या मासिकाशी बोलताना त्या म्हणाल्या की, या रकमेचा अर्थ रॉबर्ट यांच्यावर असलेले वैयक्तिक कर्ज असा घेऊ नये. ही जोडी आपल्या व्यावसायिक भागीदारांसोबत अपार्टमेंट्सच्या पोर्टफोलिओमध्ये सहभागी आहे. किम यांच्या अंदाजानुसार यात सुमारे १,५०० घरांचा समावेश आहे.

“आमच्या भागीदारांसोबत आमच्याकडे अनेक अपार्टमेंट्स आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या, होय, हे सर्व कर्ज आमच्या नावावर आहे”, असे त्या म्हणाल्या.

‘व्हॅनिटी फेअर’च्या अंदाजानुसार, रॉबर्ट यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३ दशलक्ष डॉलर्स आहे हा त्यांचा दावा खरा मानल्यास, कर्जापैकी त्यांचा स्वतःचा हिस्सा ३० दशलक्ष ते ६० दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान असू शकतो.

“त्यांना लोकांना धक्का देणारी विधाने करायला आवडतात”, असे त्यांच्या माजी पत्नी म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, “गुंतवणुकीसाठी घेतलेले कर्ज का फायदेशीर असते,” हे समजावून सांगण्यापूर्वी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रॉबर्ट या अब्जावधी डॉलर्सच्या आकड्याचा वापर करतात.