Robert Kiyosaki Warning : पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्राईल आणि अमेरिकेतील संघर्षामुळे जागतिक उर्जासंकट उभे राहिले आहे. जगाची अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली असून महासत्ता अमेरिकाही यातून सुटली नाही. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. या पडझडीच्या काळात चांदी ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांचा २०२६ चा इशारा
कियोसाकी यांच्या मते, शेअर्सचे ओव्हर व्हॅल्यूएशन, डॉलरचे घसरणारे मूल्य आणि वाढते जागतिक कर्ज यामुळे २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळू शकते. कियोसाकी यांनी गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा चांदीला अधिक पसंती दिली आहे. त्यांच्या मते, औद्योगिक मागणी आणि दुर्मिळतेमुळे चांदी ही भविष्यात अधिक फायदेशीर ठरेल. २०२६ साठी त्यांनी चांदीचे सुधारित लक्ष्य प्रति औंस २०० डॉलर इतके निश्चित केले आहे, तर सोन्यासाठी प्रति औंस २७,००० डॉलरचा अंदाज वर्तवला आहे.
मौल्यवान धातूंची बाजारातील स्थिती
मध्यपूर्वेतील युद्ध, वाढते व्याजदर आणि वधारलेला डॉलर यामुळे गेल्या काही काळात मौल्यवान धातूंवर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची ही पडझड केवळ एक ‘कन्सोलिडेशन’ टप्पा असून, मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि चलनाच्या घसरणीमुळे लवकरच मौल्यवान धातूंमध्ये ऐतिहासिक तेजी पुन्हा सुरू होऊ शकते. महागाई आणि व्याजदरांमधील वाढीचा परिणाम इक्विटीप्रमाणेच सोन्या-चांदीवरही झाला आहे. २०२६ मध्ये हे दोन्ही धातू त्यांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळी गाठतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
२०२५ मधील अंदाज खरा ठरला
यापूर्वी कियोसाकी यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये, असा अंदाज वर्तवला होता की २०२६ मध्ये चांदीचे दर १०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचतील. या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा अंदाज खरा ठरला. कियोसाकी यांनी चांदीच्या दरांचे आपले उद्दिष्ट पुन्हा वाढवून २०२६ सालासाठी २०० डॉलर्स प्रति औंसपर्यंत, तर सोन्यासाठी २७,००० डॉलर्स प्रति औंसपर्यंत निश्चित केले होते.
भारतात सोने-चांदीची काय स्थिती?
परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच सोने-चांदीच्या आयातीवर १५ टक्के आयात शुल्क लादले आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत जोरदार तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जूनच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचे दर ६ टक्क्यांनी म्हणजेच ९,२०६ रुपयांनी वधारून १,६२,६४८ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या किमतीतही प्रति किलो १६,७४३ रुपयांची प्रचंड वाढ झाली असून, चांदी आता २,९५,८०५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. यापूर्वी सोन्याने १,८०,००० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. तर चांदीनेही ४,००००० रुपये प्रति किलोच्या किमतीला स्पर्ध केला होता.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
