Robert Kiyosaki opens up about his gold price prediction mistake on social media: आर्थिक विषयावरील जगप्रसिद्ध लेखक आणि दिग्गज गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी कबूल केले की सोन्याच्या अलीकडील वाटचालीबाबत त्यांनी व्यक्त केलेला अंदाज चुकला होता, तरीही त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत सोन्याची किंमत ३५,००० डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. ‘एक्स’वर कियोसाकी यांनी केलेल्या या पोस्टमुळे आर्थिक वर्तुळात आणि सोन्याच्या गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा किमतींबाबत चर्चा सुरू झाली आहे.
रॉबर्ट कियोसाकी ‘एक्स’वर सातत्याने सोने, चांदी आणि क्रिप्टोकन्सीच्या किमतींबाबत अंदाज वर्तवत असतात. मात्र २९ जून रोजी त्यांनी उघडपणे कबूल केले की, सोन्याबाबतचा त्यांचा अलीकडील अल्पकालीन दृष्टिकोन बाजारातील परिस्थितीशी जुळणारा नव्हता.
“मी चुकीचा होता. सोन्याचे भाव अजूनही वेगाने पडत आहेत! हेच वास्तव आहे. मला माझ्या ‘रिच डॅड’कडून मिळालेला धडा हा आहे की, नफा हा खरेदी करतानाच होतो, विक्री करताना नाही. माझा अजूनही विश्वास आहे की, साधारण ५ वर्षांत सोन्याचा भाव ३५ हजार डॉलर्सपर्यंत जाईल. सर्व बाजारपेठांमध्ये चढ-उतार होतच असतात. सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार हे भविष्यासाठी गुंतवणूक करतात, आजच्या दिवसासाठी नाही. मला आशा आहे की माझ्या चुकांतून तुम्ही काहीतरी शिकला असाल. जे लोक चुका करत नाहीत, ते काहीच शिकत नाहीत”, असे रॉबर्ट कियोसाकी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते.
कियोसाकी यांची ही कबुली अवघ्या काही दिवसांपूर्वीच्या, म्हणजेच २५ जूनच्या पोस्टमधील विधानांशी विसंगत आहे. त्या पोस्टमध्ये कियोसाकी यांनी असे सुचवले होते की सोन्याच्या दरांनी आता “नक्कीच कलाटणी घेतली आहे” आणि त्यांनी विश्लेषक जिम रिकार्ड्स यांनी वर्तवलेल्या सोन्याच्या उच्च दरांच्या अंदाजांचाही संदर्भ दिला होता.
कियोसाकी यांचे आपल्या फॉलोअर्सना आवाहन
पोस्टमध्ये कियोसाकी यांनी आपल्या फॉलोअर्सना, जागतिक स्थूल-आर्थिक परिस्थिती बिघडत असतानाही प्रत्यक्ष सोने आणि चांदीची खरेदी सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सध्याची किमतींमधील चढ-उतार या स्थित्यंतराचे कारण स्पष्ट करते. ‘स्पॉट गोल्ड’चे व्यवहार सध्या प्रति औंस ४,०५० ते ४,०८० डॉलर्सच्या दरम्यान होत असून, अलीकडील सत्रांत त्यात काही टक्क्यांची घट झाली आहे. तसेच, अमेरिकन डॉलरचे बळकट होणे आणि व्याजदरांबाबत पुन्हा निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे, या वर्षाच्या सुरुवातीला गाठलेल्या ५,६०० डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे.
