Robert Kiyosaki Gold Silver Bitcoin Investment Warning: सोने, चांदी आणि बिटकॉईचे पुरस्कर्ते रॉबर्ट कियोसाकी यांनी इशारा दिला आहे की, जेव्हा गुंतवणूकदार विश्लेषणाऐवजी केवळ प्रसिद्धीच्या आधारावर सोने, चांदी किंवा बिटकॉइन खरेदी करतात, तेव्हा त्यात नुकसान होऊ शकते. ‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक आणि गुंतवणूकदार असलेल्या कियोसाकी यांनी, ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील, अमेरिकन बॉण्ड्स सुरक्षित असल्याच्या दाव्यांवर टीका केली आणि आपल्या फॉलोअर्सना गुंतवणुकीच्या संधींचे मूल्यांकन करताना रोख प्रवाहावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. या पोस्टमध्ये त्यांनी सुचवले की मूळ मालमत्तेइतकेच गुंतवणुकीची योग्य वेळ, योग्य निर्णयक्षमता आणि दृढ विश्वास हे देखील त्याच्या परताव्यावर प्रभाव टाकू शकतात.
कियोसाकी यांनी असा युक्तिवाद केला की, गुंतवणूकदारांनी भांडवलाचे मोठे साठे कोणत्या दिशेने वळत आहेत, यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले की, जपान आणि चीनसह अमेरिकन बॉण्ड्सचे (bonds) प्रमुख गुंतवणूकदार आता बॉण्ड्सची विक्री करत असून, त्याऐवजी सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत.
रॉबर्ट कियोसाकी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “जेव्हा आर्थिक सल्लागार तुम्हाला सांगतात की यूएस बॉण्ड्स सुरक्षित आहेत, तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कारण मूर्खपणापासून काहीही सुरक्षित नाही. लक्षात ठेवा, केवळ प्रसिद्धीच्या लाटेत खरेदी केल्यास सोने, चांदी आणि बिटकॉइनसुद्धा तुमचे नुकसान करू शकतात. तुमच्या पैशांच्या प्रवाहावर लक्ष ठेवा. आज जपान आणि चीनसारखे अनेक मोठे यूएस बॉण्ड धारक सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आपले बॉण्ड्स विकत आहेत.”
कियोसाकी यांनी आपल्या फॉलोअर्सना, कोणतीही कृती करण्यापूर्वी शिक्षण आणि स्वतंत्र विचारांवर अवलंबून राहण्याचा आग्रह केला.
रॉबर्ट कियोसाकी यांनी पोस्टच्या शेवटी गुंतवणूकदारांना उद्देशून म्हटले, “तुमच्या पैशांचा प्रवाह तुम्हाला काय सांगतो? नेहमी लक्षात ठेवा की तुमची सर्वात मोठी संपत्ती तुमच्या उजव्या आणि डाव्या कानाच्या मध्ये आहे. तुम्ही तुमच्या संपत्तीचे काळजीपूर्वक संरक्षण करण्याइतके हुशार आहात.”
रॉबर्ट कियोसाकी यांचा विरोधाभास
दरम्यान, कियोसाकी यांचा बिटकॉईनबाबतचा हा सावधगिरीचा इशारा त्यांच्या बिटकॉइनबाबतच्या एकूणच तेजीच्या भूमिकेशी विसंगत आहे. त्यांनी अलीकडेच बिटकाईनमधील गुंतवणूक आणि महागाईपासूनचे संरक्षण, राष्ट्रीय कर्ज व चलनाची कमकुवत स्थिती यांचा परस्परसंबंध जोडला होता. त्यांनी बिटकॉइनची किंमत २,५०,००० डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाजही वर्तवला होता. तर, दुसऱ्या एका अंदाजानुसार जागतिक आर्थिक संकटानंतर बिटकॉईनची किंमत ७,५०,००० डॉलर्सपर्यंत जाईल असे म्हटले होते.
