Robert Kiyosaki shares insights on Rich Dad Poor Dad financial advice amidst economic crisis: रॉबर्ट कियोसाकी हे त्यांच्या ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकासाठी ओळखले जातात. याचबरोबर ते मुलाखती, लेख आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्सनल फायनान्स विषयी धडे देत असतात. आता त्यांची ‘एक्स’वरील एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले, “डुकराला गायला शिकवायला जाऊ नका, यामुळे तुमचा वेळ तर वाया जातोच आणि त्यालाही त्रास होतो.”

लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दिलेल्या सल्ल्यांचा अनेकदा कसा चुकीचा अर्थ काढला जातो, यावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचं सावट असताना, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनीच आर्थिक साक्षरतेवर भर द्यावा, असे सांगतानाच त्यांनी आगामी काळातील मोठ्या आर्थिक संकटाचा इशाराही दिला आहे.

रॉबर्ट कियोसाकी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हणाले, “डुकरांना गायला शिकवू नका. त्यात तुमचा वेळ वाया जातो… आणि डुकरालाही त्रास होतो. माझ्या मते, आपल्यापैकी बहुतेकांना, तुम्हाला, मला, आपल्याला… शक्य असल्यास आपल्या जवळच्या लोकांना मदत करायची असते. तरीही कधीकधी आपली मदत नाकारली जाते, कारण याचा त्यांना त्रास होतो. हा धडा माझ्यासाठी सर्वात कठीण धड्यांपैकी एक ठरला आहे. मला पैशांच्या समस्या असलेल्या लोकांना मदत करायची आहे, त्यांना श्रीमंत आणि शक्यतो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करायचे आहे. तरीही माझा सल्ला त्यांना त्रासदायक वाटतो.”

“पैसा ही एक वैयक्तिक, भावनिक, अनेकदा सांस्कृतिक आणि बहुतेक वेळा त्यांच्या कुटुंबाची मूल्ये असतात. दुर्दैवाने, माझ्या असे लक्षात आले आहे की गरीब कुटुंबातील लोकांच्या मनात पैशाबद्दल सर्वात वाईट आणि पक्क्या कल्पना असतात आणि मी त्यामध्ये नाक खुपसल्याने त्यांना खूप त्रास होतो. हा माझ्यासाठी शिकायला मिळालेल्या सर्वात वेदनादायक धड्यांपैकी एक आहे. ज्यांना शिकण्याची इच्छा नाही, त्यांना शिकवू नका”, असे कियोसाकी पुढे म्हणाले.

पैशाच्या सर्वात अशांत काळात प्रवेश

रॉबर्ट कियोसाकी पोस्टच्या शेवटी सांभाव्य जागतिक आर्थिक संकटाबाबत म्हणाले, “काळजी घ्या. पुढे खडतर काळ आहे. चीनचा उदय, दिवाळखोर अमेरिकन अर्थव्यवस्था आणि एआयमुळे होणारी मोठ्या प्रमाणावरील नोकरकपात यांमुळे आपण पैशाच्या इतिहासातील सर्वात अशांत काळात प्रवेश करत आहोत.”