Robert Kiyosaki : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी कायम आर्थिक नियोजन आणि भविष्याबाबत लोकांना सावध करत असतात. यावेळी त्यांनी ‘बेबी बुमर्स’ पिढीसाठी ‘निवृत्तीचे मोठे संकट’ येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. बाजार कोसळण्याच्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या कियोसाकी यांनी निवृत्ती नियोजनातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. पण, हे ‘बेबी बुमर्स’ कोण आहेत? त्यांचं नेमकं कुठं चुकलं? चला जाणून घेऊ.
‘रिच डॅड पुअर डॅड’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टद्वारे मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, २०२६ पर्यंत लाखो ‘बेबी बुमर्स’ बेरोजगार होतील म्हणजेच ते निवृत्त होतील. पण, त्यांच्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात अडकण्याची शक्यता आहे.
नेमके कोण आहेत ‘बेबी बुमर्स’?
जसं आपण आत्ताच्या तरुण पिढीला जेन्झी म्हणतो त्याचप्रमाणे १९४६ ते १९६४ या काळात जन्मलेल्या पिढीला ‘बेबी बुमर्स’ म्हटले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जन्मदरात मोठी वाढ झाल्यामुळे या पिढीला हे नाव मिळाले. ही पिढी आता ६२ ते ८० वयोगटात असून, ती एकतर निवृत्त झाली आहे किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे.
निवृत्तीचे संकट का येणार?
कियोसाकी यांच्या मते, या पिढीतील अनेकांकडे स्वतःची घरे नसतील आणि हातात पैसाही नसेल. त्यांनी याची काही कारणे देखील सांगितली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता कंपन्यांकडून मिळणारी पेन्शन अत्यंत कमी झाली असून पेन्शन सिस्टिम कमकुवत होत असल्याचे त्यांचे मत आहे. आता लोक पूर्णपणे स्वतःच्या बचतीवर आणि गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यावर अवलंबून आहेत. जे वेळेवर आर्थिक साक्षर झाले नाही किंवा निवृत्तीचे नियोजन केले नाही, त्यांच्यासाठी आगामी काळ कठीण असेल.
कियोसाकींचा गुंतवणुकीचा सल्ला काय?
रॉबर्ट कियोसाकी यांनी या संकटातून वाचण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या गुंतवणूक पर्यायांचा पुनरुच्चार केला आहे. त्यांच्या मते, पारंपरिक सोने आणि चांदी आजही सुरक्षित मालमत्ता आहेत. त्यासोबतच आधुनिक क्रिप्टोकरन्सी प्रामुख्याने बिटकॉइन आणि एथेरियममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
रॉबर्ट कियोसाकी जरी अनेकदा ‘क्रॅश’च्या बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सावध करत असले, तरी यावेळी त्यांनी दिलेला ‘निवृत्ती नियोजनाचा’ सल्ला सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य पद्धतीने निवृत्तीचे नियोजन केले नाही, तर भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे आणि शिकणे आवश्यक आहे.
