Royal Enfield August 2026 Sales Growth analysis: आयशर मोटर्सच्या मालकीच्या ‘रॉयल एनफिल्ड’ या मोटरसायकल ब्रँडने ऑगस्ट २०२६ मध्ये १,२६,४७९ युनिट्सची विक्री केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे सादर केलेल्या निवेदनात कंपनीने ही माहिती दिली. ऑगस्ट २०२५ मधील १,१४,००२ युनिट्सच्या तुलनेत ही ११ टक्के वाढ आहे.
‘रॉयल एनफिल्ड’च्या विविध दुचाकींची देशांतर्गत विक्री ११ टक्क्यांनी वाढून १,१४,२०४ युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षी १,०२,८७६ इतकी होती. निर्यातीत १० टक्के वाढ होऊन ती ११,१२६ वरून १२,२७५ युनिट्सवर पोहचली आहे.
चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) आतापर्यंतची एकूण विक्री ५,७५,१३८ युनिट्स झाली आहे, जी २०२५-२६ च्या याच कालावधीतील ४,६७,५७५ युनिट्सच्या तुलनेत २३ टक्के जास्त आहे. देशांतर्गत विक्री २८ टक्क्यांनी वाढून ५,२०,६९५ युनिट्स झाली, तर याच कालावधीतील निर्यातीत ९ टक्के घट होऊन ती ५९,६६६ वरून ५४,४४३ युनिट्सवर आली.
‘रॉयल एनफिल्ड’च्या विक्रीमध्ये झालेल्या वाढीत सर्वाधिक वाटा ३५० सीसी मोटरसायकल्सचा आहे. ३५० सीसीच्या मोटरसायकल्सची विक्री १५ टक्क्यांनी वाढून १,१३,१४३ युनिट्स झाली. मागील वर्षी ही संख्या ९८,६३१ होती. याउलट ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल्सच्या विक्रीत १३ टक्के घट झाली आणि ती १५,३७१ वरून १३,३३६ युनिट्सवर आली.
रॉयल एनफिल्डने भारत आणि नेपाळमध्ये ‘क्लासिक ३५० गोरखा एडिशन’ सादर केली आहे. ही मोटरसायकल गोरखा ग्रीन रंगात असून, तिच्यावर गोरखा रेजिमेंटपासून प्रेरित आहे. या मोटरसायकलसोबतच, कंपनीने ‘गोरखा अपॅरल कलेक्शन’ देखील सादर केले आहे.
कंपनीने याचबरोबर नवी ‘कॉन्टिनेन्टल जीटी ६५०’ देखील सादर केली आहे. ज्यामध्ये ‘रॉकर रेड’ व्हेरिएंटमध्ये काळ्या रंगाचे इन्स्ट्रुमेंट काउल, नवीन एलईडी ट्रॅफिकेटर्स, एक यूएसबी टाइप-सी फास्ट-चार्जिंग पोर्ट आणि काळ्या रंगाचे इंजिन, एक्झॉस्ट व कास्ट अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत.
आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोविंदराजन यांनी सांगितले की, ऑगस्ट महिना कंपनीसाठी पुन्हा एकदा वाढीचा ठरला असून भारतातील सणासुदीच्या कालावधीकडे वाटचाल करताना यामुळे एक भक्कम पाया तयार झाला आहे.
आयशर मोटर्सच्या शेअरची कामगिरी
रॉयल एनफिल्डची पालक कंपनी असलेल्या आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत १ सप्टेंबर २०२६ रोजी ७,९३८.०० इतकी आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत ७,८७८.५० ते ८,०५२.०० या दरम्यान राहिली आणि दिवसाची सरासरी किंमत ७,९६५.२५ इतकी होती.
गेल्या ५२ आठवड्यांत, या शेअरने ६,०८५.०० ही नीचांकी आणि ८,२३०.०० ही उच्चांकी पातळी गाठली आहे. कामगिरीचा विचार करता, गेल्या सहा महिन्यांत आयशर मोटर्सच्या शेअरच्या किमतीत १.५ टक्क्यांची घट झाली आहे, तर गेल्या वर्षभरात त्यात ३२.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
