मुंबई: अमेरिकेच्या डॉलरपुढे ९२ च्या ऐतिहासिक नीचांकापर्यंत रुपया कोलमडल्याचे गुरुवारी चलन बाजारात खळबळ उडवून देणारे चित्र दिसून आले. तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा पुन्हा पिंपामागे ७० डॉलरपुढे भडका झाल्याने निर्माण केलेली धास्ती आणि परदेशी गुंतवणुकीची निरंतर माघारीचा हा गंभीर परिणाम दिसून आला.
आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपयातील व्यवहार ९१.९५ पातळीवर खुले झाले आणि सुरुवातीला त्यांनी ९१.८२ च्या उच्चांकाला गाठले. परंतु नंतर घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत ९२ च्या ऐतिहासिक नीचांकाला त्याने लोळण घेतली. दिवसाचे व्यवहार थंडावताना तो काहीसा सावरला, तरी ९१.९६ (तात्पुरता) या आपल्या सर्वकालीन नीचांकी बंद पातळीजवळ स्थिरावला.
बुधवारी, रुपया ३१ पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ९१.९९ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी बंद पातळीवर पोहोचला होता. त्या तुलनेत गुरुवारी तो ३ पैशांनी वधारलाच आहे. परंतु गेल्या आठवड्यात २३ जानेवारीला नोंदवलेल्या डॉलरमागे ९२ चा सार्वकालिक नीचांकी पातळीशी तो पुन्हा भिडताना दिसून आला.
संसदेत मांडल्या गेलेल्या आर्थिक पाहणी अहवालात, बाह्य क्षेत्रातील धोके आणि परदेशी निधीच्या बहिर्गमनाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तथापि अमेरिकी व्यापार शुल्काचा ताण पाहता रुपयातील ताजी तीव्र घसरण वाईट नसल्याचाही या अहवालाचा शेरा आहे.
महिन्याच्या अखेरीस आयातदारांची मागणी आणि खबरदारी म्हणून केलेले हेजिंग अर्थात किमतीबाबत बचावात्मक उपायांमुळे रुपयाच्या अवमूल्यानाला वेग आला आहे, असे विश्लेषकांनी नमूद केले. नजीकच्या काळातील भारताच्या चलनाची दिशा ही बर्या-वाईट जागतिक संकेतांवरूनच निश्चित होत राहील, असाही त्यांचा होरा आहे.

