एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी घसरण सुरू असली तरी परकीय गंगाजळीने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. २३ जानेवारी रोजी सरलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ८.०५ अब्ज डॉलरने वाढून ७०९.४१ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. मागील अहवाल आठवड्यात, परकीय चलन साठा १४.१६ अब्ज डॉलरने वाढून ७०१.३६ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.

याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये परकीय गंगाजळी ७०४.८९ अब्ज डॉलरच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचला होता, मात्र वर्षभरापासून डॉलरच्या तुलनेत रुपयात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनावश्यक अस्थिरता रोखण्यासाठी चलन साठ्याचा वापर केला गेल्याचे बोलले जाते आहे. शिवाय सद्यपरिस्थिती देखील डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९२ ची नीचांकी पातळी ओलांडली आहे. मात्र असे असूनही परकीय गंगाजळीने उच्चांकी पातळी गाठली आहे. परकीय चलन साठ्यात असलेल्या युरो, पाउंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकी चलनांच्या मूल्याच्या वाढीचा किंवा घसरणीचा परिणाम देखील होत असतो. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य ५.६३५ अब्ज डॉलरने वाढून १२३.०८ अब्ज डॉलर झाले आहे.

चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर सर्वाधिक परकीय गंगाजळी असणारा भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.