Rupee Depreciation Under Prime Ministers: इराण-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे व देशांतर्गत घटकांमुळे वाढलेले कच्च्या तेलाचे भाव, त्यामुळे वाढलेली महागाई, परकीय गुंतवणुकीचा बहिर्प्रवाह आणि शेअर बाजारातील घसरण यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या मते येत्या काळात परिस्थिती बदलली नाही, तर रुपया शंभरच्या खाली घसरू शकतो. रुपयातील या घसरणीमुळे कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात रुपया वधारला होता आणि कोणाच्या कार्यकाळात सर्वाधिक घसरला होता यावर चर्चा होऊ लागली आहे.

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते या पदावर कायम आहेत. २६ मे २०१४ रोजी जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अंदाजे ५८.६६ वर व्यवहार करत होता. आज त्याने ९७ पर्यंत नीचांकी पातळी गाठली आहे.

मनमोहन सिंग

मनमोहन सिंग २००४ ते २०१४ असे सलग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या २२ मे २००४ ते ३१ मार्च २०१४ या ३६०० दिवसांच्या कार्यकाळात रुपयाचे वार्षिक ३.२१ टक्के दराने अवमूल्यन झाले होते. म्हणजे १० वर्षांत रुपया एकूण ३१.६५ टक्के घसरला होता. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा रुपयाचा दर ४५.३१ इतका होता आणि ३१ मार्च २०१४ रोजी रुपयाचा दर ५९.६५ रुपयांवर पोहोचला होता.

अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात (१९ मार्च १९९८ ते २२ मे २००४) रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ४१.२५ रुपयांवरून ४५.३१ रुपयांपर्यंत घसरले. ही वार्षिक घसरण केवळ १.५९ टक्के इतकी होती, तर एकूण घसरण ९.८४ टक्के नोंदवली गेली.

atal bihari vajpayee pm tenure rupee fall vs dollar
Photo: PTI

चंद्रशेखर

चंद्रशेखर पंतप्रधान होते तेव्हा रुपया सर्वाधिक घसरला होता. त्यांनी १० नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी रुपयाचा विनिमय दर १७.५० इतका होता. २१ जून १९९१ रोजी, म्हणजेच पंतप्रधान म्हणून २२३ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला तेव्हा हा दर झपाट्याने घसरून २२.७४ रुपयांवर पोहोचला होता. ही एकूण ९.९४ टक्के आणि वार्षिक ४९.०४ टक्के इतकी घसरण होती.

जवाहरलाल नेहरू

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान म्हणून ६,१३० दिवस काम केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते, तेव्हा रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या बरोबरीचे होते. मात्र, नेहरूंचा कार्यकाळ संपेपर्यंत, हे मूल्य घसरून प्रति डॉलर ४.७६ रुपयांपर्यंत पोहोचले होते. ही घसरण वार्षिक २२.४० टक्के इतकी होती, म्हणजेच एकूण ३७६.०० टक्क्यांचे नुकसान झाले होते.

लाल बहादूर शास्त्री

नेहरूंचे उत्तराधिकारी लाल बहादूर शास्त्री यांनी ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ या कालावधीत, म्हणजेच ५८१ दिवस पंतप्रधानपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात, रुपयाचे मूल्य ४.७६ रुपयांवरून वार्षिक २१ टक्क्यांच्या दराने घसरून प्रति डॉलर ६.३५ रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचले. यात एकूण ३३.४० टक्क्यांचे नुकसान झाले.

आय. के. गुजराल

रुपयाची सर्वात वाईट स्थिती आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात झाली होती. त्यांनी २१ जानेवारी १९९७ रोजी पदभार स्वीकारला आणि १९ मार्च १९९८ रोजी तो सोडला. त्यांच्या ४२२ दिवसांच्या कार्यकाळात, रुपयाचे मूल्य ३६.३१ रुपयांवरून वार्षिक ११.७८ टक्क्यांच्या दराने घसरून ४१.२५ रुपयांवर पोहोचले, ज्यामुळे एकूण १३.६१ टक्क्यांचे नुकसान झाले.

पी. व्ही. नरसिंहराव

पी. व्ही. नरसिंहराव यांचे सरकार २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ या कालावधीत सत्तेवर होते. या १७९१ दिवसांच्या काळात, रुपयाचे मूल्य २२.७४ रुपयांवरून ३५.४३ रुपयांपर्यंत कोसळले. म्हणजेच वार्षिक ११.३८ टक्क्यांची घसरण झाली.

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी यांचा दुसरा कार्यकाळ १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ या दरम्यान होता. त्यांच्या या १७५२ दिवसांच्या कार्यकाळात, ७.८६ रुपये प्रति डॉलर असलेला रुपया ११.६० रुपयांपर्यंत घसरला होता. म्हणजेच यात वार्षिक ९.९२ टक्के घसरण झाली होती, जी एकूण ४७.५८ टक्के होती.

अगदी त्यांच्या २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ या पहिल्या कार्यकाळातील ४०७७ दिवसांच्या कालावधीत, ६.३५ रुपयांवर असलेला रुपया वार्षिक ३.३६ टक्क्यांनी घसरून ८.७३ रुपयांपर्यंत पोहोचला होता. ज्यामुळे रुपयाचे एकूण ३७.४८ टक्के अवमूल्यन झाले होते.

व्ही. पी. सिंह

व्ही. पी. सिंह २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० असे ३४३ दिवस पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात, डॉलरचा दर १६.२२ रुपयांवरून वार्षिक ८.४० टक्क्यांनी घसरून १७.५० रुपये प्रति डॉलरवर पोहोचला होता. ज्यामुळे रुपयाचे एकूण ७.८९ टक्क्यांचे अवमूल्यन झाले होते.

राजीव गांधी

राजीव गांधी यांच्या ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ या १८५८ दिवसांच्या कार्यकाळात, ११.६० रुपयांवर असलेला रुपया वार्षिक ७.८३ टक्क्यांनी घसरून १६.२२ रुपये प्रति डॉलरवर पोहोचला होता. ज्यामुळे रुपयाचे एकूण ३९.८३ टक्क्यांचे अवमूल्यन झाले होते.

एच. डी. देवेगौडा

एच. डी. देवेगौडा १ जून १९९६ ते २१ जानेवारी १९९७ म्हणजेच एकूण २३४ दिवस पंतप्रधान होते. या काळात, ३५.४३ रुपये प्रति डॉलर असा दर असलेल्या रुपयाचे मूल्य वार्षिक ३.८७ टक्क्यांनी घसरून ३६.३१ रुपये प्रति डॉलरवर पोहोचले. ही एकूण २.४८ टक्क्यांची घसरण होती.

दोनच पंतप्रधानांच्या कार्यकाळात रुपया वधारला

मोरारजी देसाई आणि चरण सिंग या केवळ दोनच पंतप्रधानांच्या कार्यकाळात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारले होते. देसाई यांच्या १९ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ या ८५६ दिवसांच्या कार्यकाळात, रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८.७३ रुपयांवरून ८.१२ रुपयांपर्यंत वधारले होते. तर चरण सिंग यांच्या २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या १७० दिवसांच्या कार्यकाळात, रुपयाचे मूल्य ८.१२ रुपयांवरून ७.८६ रुपयांपर्यंत वधारले होते.