S Jaishankar global food crisis warning : कच्च्या तेलाचे भडकलेले दर तुम्हाला मोठं संकट वाटत असेल तर ही वादळापूर्वीची शांतता आहे, असे समजा. रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. आगामी काही महिन्यांत जगभरात ‘भीषण अन्नधान्य संकट’ निर्माण होण्याचा गंभीर इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. न्यू यॉर्क येथील ‘आशिया सोसायटी’मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या युद्धांचा विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत विनाशाक परिणाम होत असल्याचे जयशंकर म्हणाले.

सध्या जगासमोर ४ मोठे प्रश्न असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा संकट

इराण आणि अमेरिका युद्धामुळे तेलाच्या बाजारपेठा आधीच खूप दबावात असताना, राजकीय हितसंबंधांसाठी तेल पुरवठ्याबाबत खेळले जाणारे राजकारण किमती आणखी भडकवत आहे. यामुळे उर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. जगातील एकूण उर्जा पुरवठ्याच्या २० टक्के पुरवठा एकट्या होर्मुझच्या सागरी मार्गातून होतो. पण, गेल्या काही महिन्यांपासून येथील पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

खतांची तीव्र टंचाई

युक्रेन, रशिया आणि पश्चिम आशियातून जगभरात मोठ्या प्रमाणात खतांचा पुरवठा होतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खतांचे उत्पादन आणि निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच ‘सुपर अल निनो’ सारख्या हवामानातील बदलांमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे.

धान्य निर्यातीत अडथळे

काळा समुद्र मार्गावरील निर्यातीत मोठे अडथळे निर्माण झाल्याने प्रमुख धान्य उत्पादक देशांना आपली जहाजे बाहेर पाठवणे आव्हानात्क ठरत आहेत. यामुळे आगामी काळात अनेक देशांमध्ये धान्यसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

आर्थिक स्थलांतर

सध्या जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा विकसनशील देशांमधून काढून अमेरिका किंवा युरोपसारख्या श्रीमंत आणि सुरक्षित देशांमध्ये गुंतवत आहेत. ज्यामुळे विकसनशील देशांची आर्थिक कोंडी होत आहे.

‘देशांनी अतिस्वार्थी होऊ नये’

विकसनशील देशांवर ओढवलेल्या या आर्थिक संकटावर बोलताना एस. जयशंकर यांनी विकसित राष्ट्रांना थेट खडे बोल सुनावले. जयशंकर म्हणाले की, ‘इतरांच्या जीवनात अडचणी निर्माण करणे आमचा हेतू नव्हता, असे सांगून धोरणकर्ते आपल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झटकून टाकू शकत नाहीत.’ “देशांनी इतके आत्ममग्न होऊ नये की, केवळ स्वतःच्याच विश्वात राहून निर्णय घ्यायचे आणि नंतर म्हणायचे की, ‘तुमचे जीवन कठीण करणे हा माझा उद्देश नव्हता’.”

राजकीय अस्थिरतेची मोठी टांगती तलवार

केवळ आर्थिकच नव्हे, तर या ऊर्जा आणि अन्नधान्याच्या संकटामुळे ग्लोबल साऊथच्या शेजारील देशांमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, अशी भीती जयशंकर यांनी व्यक्त केली.