Sachin Tendulkar Hitwicket Investment Details: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘हिटविकेट’ या मोबाइल क्रिकेट स्ट्रॅटेजी गेमची पालक कंपनी, ‘मेटास्पोर्ट्स इंटरअॅक्टिव्ह’मध्ये धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक केली आहे. मात्र, सचिनने यात किती गुंतवणूक केली याचा तपशील जाहीर केलेला नाही. दरम्यान कंपनीने पुढील तीन वर्षांत ‘हिटविकेट’चे १० कोटी डाउनलोड्स गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच या कंपनीमध्ये प्रसिद्ध समालोच हर्षा भोगले यांचीही गुंतवणूक आहे.
कश्यप रेड्डी आणि कीर्ती सिंग यांनी स्थापन केलेल्या ‘मेटास्पोर्ट्स’ कंपनीने २०२० मध्ये ‘हिटविकेट’ (Hitwicket) गेम लाँच केली. तेव्हापासून १२० देशांमधील २ कोटींहून अधिक युजर्सनी या गेमचा अनुभव घेतला आहे. कंपनीने जाहीर केले की, गेल्या सहा महिन्यांत त्यांच्या महसुलात १०० टक्क्यांची वाढ झाली आहे, तर युजर्स या प्लॅटफॉर्मवर दररोज सरासरी ५१ मिनिटे घालवतात.
‘हिटविकेट’ हा गेम धोरणात्मक निर्णयांवर आधारित आहे. यामध्ये खेळाडूंना अशा प्रकारच्या रणनीतींची निवडी कराव्या लागतात, ज्या क्रिकेटपटू मैदानात घेत असलेल्या निर्णयांतून प्रेरित असतात.
“क्रिकेटमध्ये नेहमीच गोलंदाजाचे डावपेच ओळखणे, क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेणे आणि प्रत्येक बॉलसाठी योग्य रणनीती ठरवणे यांचा समावेश असतो. हिटविकेट हा गेम क्रिकेटपटू मैदानावर कसा विचार करतो, त्याचप्रकारे युजरलाही विचार करायला लावतो”, असे सचिन म्हणाला.
गुंतवणुकीसह या गेमच्या ॲपमध्ये कंटेंट आणि ब्रँड ॲक्टिव्हेशन्समध्येही सचिन दिसणार आहे. मेटास्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ कश्यप रेड्डी म्हणाले की, या भागीदारीमुळे कंपनीला उच्च दर्जाचे क्रिकेटपटू खेळाकडे कसे पाहतात याबद्दलच्या सचिनच्या समजुतीतून शिकण्याची आणि त्या माहितीचा उपयोग युजर्सचा सहभाग वाढवण्यासाठी होईल.
‘सचिन सागा’
सचिन तेंडुलकरने यापूर्वी ‘सचिन सागा’ क्रिकेट गेमिंग फ्रँचायझीसाठी ‘जेटसिंथेसिस’सोबत भागिदारी केली होती. यामध्ये २०१७ मध्ये लाँच झालेला ‘सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स’ या गेमचाही समावेश होता. याव्यतिरिक्त २०२१ मध्ये सचिनने पुणेस्थित डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनीमध्ये २० लाख डॉलर्सची गुंतवणूकही केली होती.
स्पिनी
२०१५ मध्ये सुरू झालेल्या स्पिनी या सेकेंड हँड कार विक्री करण्यासाठीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सचिनने गुंतवणूक केली आहे. सचिन या कंपनीत धोरणात्मक गुंतवणूकदार असण्यासोबतच मुख्य ब्रँड अँबेसेडरही आहे.
इतर गुंतवणूक
२०२५ च्या अखेरीस सचिनने ट्रुझॉन सोलर (सनटेक एनर्जी) मध्ये ३.६ कोटी रुपयांची एंजल गुंतवणूक करत २ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. यासोबतच सचिनच्या मार्गदर्शनाखाली २०२४ मध्ये सुरू झालेल्या व्हेंचर प्लॅटफॉर्म ‘टेन एक्स यू’ने ३.४ दशलक्ष डॉलर्सच्या मूल्यांकनापर्यंत मजल मारली आहे.
