Sai Martand Tech Mahindra Marathi : पुण्यातील आयटी कंपनी टेक महिंद्रात ‘नेटवर्क इंजिनिअर’ म्हणून काम करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पणातच धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असताना, त्याने जगभरातील सिनेमे पाहिले. काम सांभाळून चित्रपटांचा बारकाईने अभ्यास केला आणि एक दिवस नोकरीला रामराम करुन थेट चित्रपट दिग्दर्शक बनला. आज त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४० कोटींची कमाई केली आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर केलेली एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाली असून, यात त्याने महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची माफी मागितली आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
सर्वात यशस्वी तरुण दिग्दर्शक
साई मार्तंड, असे या यशस्वी तरुण दिग्दर्शकाचे नाव आहे. २०२५ मधील सर्वात फायदेशीर तेलगू चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘लिटल हार्ट्स’ या चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी साईने २०२३ मध्ये पुण्यातील टेक महिंद्रा कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. अवघ्या दोन वर्षांत त्याने ‘लिटल हार्ट्स’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. केवळ २.४ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या यशानंतर साऊथचे सुपरस्टार महेश बाबू आणि नानी यांनीही साई मार्तंडच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
“सॉरी आनंद महिंद्रा सर…”
साई मार्तंडने २०२१ ते २०२३ या काळात टेक महिंद्राच्या पुणे कार्यालयात नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम केले होते. १२ एप्रिल २०२३ रोजी त्याने या नोकरीचा राजीनामा दिला. याविषयी त्याने गोड आठवण सांगितली आहे. साईने लिहिलंय, की कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’चा मी खूप फायदा उचलला. मी कधीही एका ठिकाणी थांबलो नाही. खरं सांगायचं तर मी कधीही आदर्श कर्मचारी नव्हतो. लॉग-इन करून अनेकदा मी कामाच्या वेळेत झोपायचो, चुलत भावांसोबत फिरायचो, ढीगभर चित्रपट पाहायचो आणि चित्रपट दिग्दर्शकांच्या मुलाखती ऐकायचो.
पुढे साई लिहितो, “सॉरी आनंद महिंद्रा सर! पण हो, टेक महिंद्राने दिलेल्या सर्व आठवणींसाठी मनापासून धन्यवाद”. ते दिवस माझ्यासाठी नेहमीच खास राहतील. मी नोकरी सोडताना सहकाऱ्यांनी दिलेले ‘स्मार्टवॉच’ हे फेअरवेल गिफ्ट आणि टीमने दिलेली साथ याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले.
तरुण वयात मोठं काम
अवघ्या २७ व्या वर्षी साईने केलेली कमाल पाहून चित्रपट क्षेत्रात त्याचं चांगलच नाव वाढलं आहे. अनेक चांगल्या पुरस्कार सोहळ्यात त्याचा गौरव होत आहे. प्रतिष्ठित ‘तेलंगणा गदर फिल्म अवॉर्ड्स’मध्ये त्याला ‘बेस्ट डेब्यु फिचर फिल्म डायरेक्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुढील चित्रपटाची घोषणा
या पहिल्याच धमाक्यानंतर साईने आपल्या पुढील मोठ्या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अदिवी शेष याच्या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन साई मार्तंड करणार आहे. अदिवी शेषचा बहुप्रतिक्षित ‘G2’ (गुडाचारी २) हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या नवीन प्रोजेक्टचे शूटिंग सुरू होणार आहे.
