Salary Hike 2026 : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिना जवळ आला की पगारवाढीची उत्सुकता लागते. दरवर्षी कोणत्या सेक्टरमध्ये चांगली पगारवाढ होणार याचीही चर्चा रंगते. यंदाही क्षेत्रनिहाय कुठे सर्वाधिक वेतनवाढ होणार याची माहिती समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे प्रत्येकवेळी टॉपला असणारे माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी यावेळी मागे पडले आहे. त्याऐवजी उत्पादन, इंजिनिअरिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राने बाजी मारली आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार घसघशीत पगारवाढ
उत्पादन, इंजिनिअरिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये सरासरी पगारवाढ ९.४ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा दर ७.९ टक्के इतका होता. ‘टीमलीज सर्व्हिसेस’च्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर क्षेत्रातील विस्तार आणि ‘इंडस्ट्री ४.०’ च्या अंमलबजावणीमुळे या क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे.
कोणत्या पदांना मिळणार सर्वाधिक पगारवाढ?
या यादीत प्रोजेक्ट इंजिनिअर्स पहिल्या क्रमांकावर असून त्यांना सर्वाधिक १०.७% पगारवाढीचा अंदाज आहे. ईएचएस ऑफिसर्स (EHS – पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा अधिकारी) १०.१% वेतनवाढीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. साईट इंजिनिअर्स १०.१% तर मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर्सला ९.९% पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे.
आयटीला मागे टाकत इंजिनिअरिंग विभाग आघाडीवर
एआय आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मंदीचा परिणाम पगारवाढीवर होताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे यावर्षी वेतनवाढीत इंजिनिअरिंग विभाग आघाडीवर आहे. विभागनिहाय विचार केल्यास, इंजिनिअरिंग विभागात सर्वाधिक ९.९% पगारवाढ अपेक्षित आहे. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान (IT) विभागात ९.८% आणि वित्त विभागात ९.५% पगारवाढ होऊ शकते. उत्पादन क्षेत्रातील तंत्रज्ञान आता डिजिटल सिस्टीम्स आणि ऑटोमेशनशी जोडले जात असल्याने, तांत्रिक आणि डिजिटल कौशल्यांचा मेळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी वेगाने वाढत आहे.
शहरांनुसार पगारवाढीचा आलेख: पुण्याचा ‘टॉप ५’ मध्ये समावेश
पगारवाढीमध्ये भौगोलिक स्थान हा देखील एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर येत आहे. यामध्ये वेगाने विकसित होणारे गुडगाव आणि कोईम्बतूर शहरे आघाडीवर आहेत. पगारवाढीमध्ये गुडगाव १०.९% वाढीसह आघाडीवर आहे, तर त्यापाठोपाठ कोईम्बतूर १०.८% वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. हैदराबाद आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये १०.१% पगारवाढ होण्याची शक्यता आहे, तर वडोदरा ९.९% वाढीसह त्यानंतरच्या स्थानावर आहे.
