Sameer Modi Bina Modi Case legal dispute withdrawn stock analysis: उद्योगपती के. के. मोदी यांच्या व्यावसायिक वारशावरून सुरू असलेल्या दीर्घकालीन वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण समीर मोदी यांनी आपली आई बीना मोदी यांच्याविरुद्धचे सर्व कायदेशीर खटले मागे घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तानंतर मंगळवारी ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया’च्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. एनएसई वर हा शेअर २,४१० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र त्यानंतर नफा वसुलीमुळे त्यातील काही वाढ कमी झाली.
गुंतवणूकदारांनी या घडामोडीला एक सकारात्मक संकेत मानले, कारण त्यांच्या मते कौटुंबिक वादावर सामंजस्यपूर्ण तोडगा निघाल्यास मोदी ग्रुपच्या व्यवसायांसंदर्भातील अनिश्चितता कमी होऊ शकते आणि भागधारकांसाठी ते लाभदायक ठरू शकते.
द इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत समीर मोदी यांनी आपल्या आईविरुद्धचे सर्व कायदेशीर खटले मागे घेतल्याचे स्पष्ट केल्यानंतर शेअरच्या भावातील वाढ दिसून आली.
“मी सर्व खटले मागे घेतले आहेत. मला वाद घालायचा नाही. कुटुंबात सलोखा निर्माण होईल अशी आशा आहे. वारसा हा कंपन्यांच्या पलीकडचा असतो. कंपन्यांपेक्षा कुटुंबे अधिक काळ टिकतात”, असे समीर मोदी म्हणाले.
दिवंगत के. के. मोदी यांच्या व्यावसायांच्या वाटणीवरून समीर मोदी आणि त्यांच्या आई बीना मोदी यांच्यात दीर्घकाळापासून कायदेशीर वाद सुरू होता. २०२४ मध्ये ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया’च्या संचालक मंडळातून हटवण्याशी संबंधित आरोपांचाही या वादात समावेश होता.
गेल्या काही वर्षांपासून मोदी कुटुंबातील वादामुळे समूहाच्या व्यवसायांवर एक प्रकारचे सावट होते. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, समीर मोदी यांनी कायदेशीर खटले मागे घेण्याच्या निर्णयाकडे गुंतवणूकदार कौटुंबिक वाद मिटवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो आणि समूहाच्या विविध व्यवसायांचे मूल्य वाढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या वृत्तात पुढे असेही नमूद केले आहे की, खटले मागे घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर या शेअर्सच्या खरेदीमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढला.
गॉडफ्रे फिलिप्स इंडिया ही मोदी एंटरप्रायझेस ग्रुपची प्रमुख सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी भारतात मार्लबोरो सिगारेटचे उत्पादन आणि वितरण करते. या कंपनीचे बाजार भांडवल जवळपास ३५,००० कोटी रुपये आहे. तंबाखू व्यतिरिक्त, मोदी एंटरप्रायझेस ग्रुप खते, नेटवर्क मार्केटिंग आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही कार्यरत आहे. समीर मोदी सध्या मोदी केअर आणि कलरबार यांसारख्या व्यवसायांची देखरेख करतात.
