SBI Card fined 50000 consumer forum Delhi: ‘एसबीआय कार्ड’ला दिल्लीतील ग्राहक आयोगाने एका कार्डधारकाला ५०,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या कार्डधारकाला तिने मागणी केलेल्या शुल्कापेक्षा अधिक वार्षिक शुल्क असलेले क्रेडिट कार्ड देण्यात आले होते. याबद्दल तक्रार करूनही तिला ते कार्ड ‘डाउनग्रेड’ किंवा बंद करता आले नाही. तिने ४९९ रुपये शुल्क असलेले कार्ड मागितले होते, परंतु प्रत्यक्षात तिला २,९९९ रुपये वार्षिक शुल्क असलेले कार्ड देण्यात आले.
तिच्या तक्रारीनुसार, तिने ४९९ रुपये वार्षिक शुल्क असलेल्या ‘एसबीआय सिम्पली क्लिक’ क्रेडिट कार्डची निवड केली होती. मात्र, तिला २,९९९ रुपये वार्षिक शुल्क असलेले ‘एसबीआय क्लब विस्तारा’ कार्ड देण्यात आल्याचे तिने सांगितले.
तिने आयोगाला सांगितले की, तिने त्या कार्डचा वापर केला नव्हता आणि कमी शुल्क असलेले कार्ड मिळवण्यासाठी ‘एसबीआय कार्ड्स’शी संपर्क साधला होता. तिच्या विनंतीवरही कार्यवाही न झाल्यामुळे तिने ग्राहक मंचाकडे दाद मागितली.
कार्डधारक महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला ४९९ रुपये वार्षिक शुल्काच्या क्रेडिट कार्ड देण्याची ऑफर देण्यात आली होती. तिने ‘सिम्पली क्लिक’ हा पर्याय निवडला होता. तिच्या तक्रारीनुसार, एसबीआय कार्डच्या एका प्रतिनिधीने ‘क्लब विस्तारा’ कार्डसाठी तिची बायोमेट्रिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यानंतर तिच्या नावे ७३,००० रुपये क्रेडिट मर्यादा असलेले कार्ड जारी करण्यात आले.
नंतर तिला असे आढळले की, त्या कार्डसाठी २,९९९ रुपये वार्षिक शुल्क आणि जीएसटी आकारला गेला होता. ही रक्कम तिने अपेक्षित केलेल्या शुल्काच्या तुलनेत सुमारे सहापट अधिक होती. ३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या बिलामध्ये २,९९९ रुपये वार्षिक शुल्क आणि ५९२.३२ रुपये जीएसटी नमूद करण्यात आला होता. चुकीच्या कार्डबाबत तिने कंपनीशी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधला आणि त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवली.
तिने नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये आणि कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून १५,००० रुपयांची मागणी केली. तिची तक्रार ३ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखल करण्यात आली. तिने आयोगाला सांगितले की, तिने ते कार्ड वापरले नव्हते. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ, तिने पुराव्यादाखल एक शपथपत्र, तसेच कार्डचे स्टेटमेंट आणि एसबीआय कार्डला पाठवलेल्या ईमेल्सच्या प्रती सादर केल्या.
आयोगाचे म्हणणे काय होते?
आयोगाने नमूद केले की, संबंधित कार्डधारकाला मिळालेले कार्ड बदलायचे होते, ही बाब स्पष्ट होती. तिला वारंवार हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते आणि तिने अनेकदा तसे केलेही होते. मात्र, नंतर एसबीआय कार्डने कोणतेही कारण न देता हे कार्ड ‘डाउनग्रेड’ करता येणार नाही, असे कळवले.
कार्ड बंद करण्याच्या मुद्द्यावर आयोगाने म्हटले की, जर कार्ड ‘डाउनग्रेड’ करता येत नव्हते, तर ते बंद का केले गेले नाही हे “समजणे कठीण” आहे. त्यानंतर, आयोगाने एसबीआय कार्डला सेवेतील त्रुटीसाठी दोषी ठरवले.
