SBI Q2 Net Profit 23038 Crore: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी नोंदवत २३,०३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यात वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत बँकेने २०,१६० कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून १,४३, ७९६ कोटी रुपयांवर पोहोचले. मागील वर्षी याच कालावधीत ते १,३४,९७९ कोटी रुपये होते. बँकेच्या व्याज उत्पन्नातही वाढ झाली असून, ते १,१९,६५४ कोटी रुपयांवरून वाढून १,३२,०१९ कोटी रुपयांवर गेले.

बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. ३० सप्टेंबर २०२६ अखेर एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण एकूण कर्जाच्या तुलनेत १.३९ टक्क्यांवर आले आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण १.७३ टक्के होते. त्याचप्रमाणे निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे (नेट एनपीए) प्रमाणही ०.४२ टक्क्यांवरून घसरून ०.३६ टक्क्यांवर आले आहे. अनुत्पादित कर्जांसाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीतही घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जांसाठी बँकेने २,७५९ कोटी रुपयांची तरतूद केली. मागील वर्षी याच तिमाहीत ही तरतूद ४,१३२ कोटी रुपये होती.

दरम्यान, स्टेट बँक समूहाच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक तुलनेत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. समूहाचा एकत्रित नफा २१,१३७ कोटी रुपयांवरून वाढून २५,३६१ कोटी रुपयांवर पोहोचला. समूहाचे एकूण उत्पन्नही मागील वर्षीच्या १,७५,८९८ कोटी रुपयांवरून वाढून १,८७,७५६ कोटी रुपयांवर गेले. बँकेच्या भांडवली पर्याप्तता गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे. सप्टेंबर २०२६ अखेर हे गुणोत्तर १६.०९ टक्क्यांवर पोहोचले. मागील वर्षी सप्टेंबरअखेर ते १४.६२ टक्के होते. मंगळवारच्या सत्रात स्टेट बँकेचा समभाग १.७० टक्क्यांनी घसरून ९७०.२५ रुपयांवर बंद झाला.