SBI Research LTCG Tax Abolition Impact: दीर्घकालीन भांडवली नफा कर (LTCG) सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी रद्द केला, तरी केंद्र सरकारच्या वित्तीय तूट नियंत्रणाच्या उद्दिष्टांवर मोठा परिणाम होणार नाही. हा कर रद्द केल्यास आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये सरकारला सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल. मात्र, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) तुलनेत हा महसुली तोटा केवळ ०.१ ते ०.२ टक्के असल्याने सरकारला तो सहज पेलणे शक्य आहे, असा निष्कर्ष एसबीआय रिसर्चने आपल्या अहवालात मांडला आहे.

एसबीआय रिसर्चच्या ताज्या ‘इकॉनॉमिक रिसर्च’ (इकॉनॉर्प) अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एलटीसीजी करातून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये हा महसूल घटून ५० हजार कोटी रुपयांवर येण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मात्र या करातून १.३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षात शेअर बाजाराने सुमारे ३० टक्के परतावा दिल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफावसुली केली होती. त्यामुळे त्या वर्षातील ‘एलटीसीजी’ कराचे उत्पन्न अधिक होते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. गेल्या तीन वर्षांत निफ्टीचा सरासरी परतावा केवळ ०.५ टक्के राहिला आहे. त्याचवेळी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून एकूण ४.८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भांडवली नफा कर रद्द केला, तरी त्याचा महसुली फटका सरकारला सहन करणे शक्य असल्याचे एसबीआय रिसर्चने म्हटले आहे.

कररचनेत बदलांची शिफारस

एलटीसीजी कर रद्द करण्याबरोबरच भांडवली नफा कराच्या सध्याच्या रचनेत काही बदल करण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे. सध्या वार्षिक १.२५ लाख रुपयांपर्यंतच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करसवलत आहे. ही मर्यादा वाढवून दोन लाख रुपये करावी आणि महागाईच्या दराशी जोडावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना अधिक दिलासा मिळू शकेल.

तसेच, गुंतवणूक जितका अधिक काळ टिकवून ठेवली जाईल, तितका कमी कर आकारला जावा, अशी कररचना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार, दोन ते तीन वर्षे गुंतवणूक कायम ठेवल्यास मिळणाऱ्या नफ्यावर पाच टक्के कर आकारावा. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक कायम ठेवल्यास ‘एलटीसीजी’ कर पूर्णपणे माफ करावा. तर एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी सध्याचा १२.५ टक्के कर कायम ठेवावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

‘एसटीटी’तून महसूल भरपाई शक्य

‘एलटीसीजी’ कर रद्द केल्यामुळे होणाऱ्या महसुली नुकसानीची काही प्रमाणात भरपाई करण्यासाठी भांडवली रोखे व्यवहार करात (एसटीटी) ५० टक्क्यांची वाढ करण्याचा पर्यायही एसबीआय रिसर्चने सुचवला आहे. या वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये सरकारला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढल्यानंतर ९० दिवसांच्या आत ती रक्कम पात्र इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये पुन्हा गुंतविल्यास, अशा व्यवहारांवरील एलटीसीजी कर पुढे ढकलण्याची शिफारसही करण्यात आली आहे.