भांडवली बाजारातील वायदे व्यवहारांबाबत चिंता करण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्या दिसत नाही. मात्र अल्प मुदतीच्या वायदे व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’चे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी मंगळवारी दिली.

अल्प मुदतीच्या वायदे व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यावर मर्यादा आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वायदे व्यवहारातील योग्य किंमत आणि तरलता यांची मुख्य भूमिका कायम ठेवण्यावर भर दिला जात आहे. एकंदरीत वायदे व्यवहारांबाबत कोणतीही समस्या अद्याप निर्माण झालेली नाही. ही समस्या केवळ अल्प मुदतीच्या वायदे व्यवहारांबाबत आहे. सेबीने हे अल्प मुदतीचे व्यवहार कमी करण्यासाठी नियामक पावले उचलली आहेत. ही पावले ऑक्टोबर २०२४ आणि मे २०२५ मध्ये उचलण्यात आली. त्यांची अंमलबजावणी जुलै, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशी टप्प्याटप्प्याने होईल, असे पांडे यांनी सांगितले.

नियामकांच्या हस्तक्षेपाचे वायदे बाजारावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण बाजारातील आकडेवारीच्या आधारे करण्यात येत आहे. यातून हस्तक्षेपाची आणखी गरज दिसून आल्यास पर्यायी मार्गाने तो करण्यात येईल. यासाठी सर्व घटकांशी सल्लामसलत करून इच्छित उद्दिष्ट गाठण्यात येईल. सेबीकडून व्यापक पातळीवर या मुद्द्याकडे पाहिले जात आहे. यातील नेमक्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे, असे पांडे यांनी नमूद केले.

अल्प मुदतीचे वायदे व्यवहार काय?

अल्प मुदतीचे वायदे व्यवहार हे त्याच दिवशी संपुष्टात येतात अथवा मोजक्या दिवसांसाठी असतात. ते स्वस्त असतात आणि त्यातून जास्त परतावा मिळण्याची संधी असते. त्यामुळे दलाल या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात पैसे लावतात. त्यातून बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांनुसार हे व्यवहार पार पडतात. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असल्याने जोखीमही अधिक असते. विशेष करून किरकोळ गुंतवणूकदारांना यात मोठा फटका बसतो.