Household Savings: भारतात कौटुंबिक बचत ही अधिकाधिक भांडवली बाजाराकडे वळत आहे आणि ते वेगाने उदयास येत असलेले संपत्ती निर्मितीचे माध्यम बनत आहे, असे सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.सेबीप्रमुख म्हणाले की, भारताचे भांडवली बाजार केवळ देशाच्या विकासाचे प्रतिबिंब नाहीत, तर ते कौटुंबिक बचतीला उद्योग-व्यवसायांशी जोडणारे महत्त्वाचे साधनही आहे.
जागतिक भांडवल आकर्षित करून आणि आर्थिक गतीचे गुंतवणुकीच्या संधींमध्ये रूपांतर करून विकासाला सक्रियपणे ते चालना देत आहे. बचतीचे हे वित्तीयकरण म्हणजे भारतीयांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीत होत असलेला संरचनात्मक बदल आहे आणि देशाच्या विकासगाथेत जनसहभागाला देखील ते अधोरेखित करते, असे पांडे यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीजद्वारे आयोजित गुंतवणूकदार परिषदेनिमित्ताने माध्यमांशी बोलताना सांगितले.
पांडे म्हणाले की, विविध वित्तीय साधनांमधील व्यापक सहभागामुळे, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या अर्थात जीडीपीच्या तुलनेत कौटुंबिक आर्थिक बचतीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२३ मधील सुमारे २० टक्क्यांवरून, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २१.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या घडामोडींतील एक सुस्पष्ट बदल हा की, कुटुंबे आपली बचत अधिकाधिक बाजार-संलग्न गुंतवणूक पर्यायांकडे वळवत आहेत. भारतीय बाजाराची वाढती व्याप्ती अधोरेखित करताना पांडे म्हणाले की, देशात आता रोखे बाजारात सुमारे १४.५ कोटी गुंतवणूकदार आहेत आणि गुंतवणूकदारांची ही संख्या वार्षिक २० टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. त्यांनी नमूद केले की, म्युच्युअल फंडांची मालमत्ता सुमारे १२ लाख कोटी रुपयांवरून, गेल्या काही वर्षांत ८० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भांडवली बाजारातील सामान्य कुटुंबांतून सहभागही सातत्याने वाढत आहे.
त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपन्यांची प्रारंभिक समभाग विक्री ४.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली, तर ३६६ ‘आयपीओ’द्वारे वर्षभरात सुमारे १.९ लाख कोटी रुपये उभारले गेले. कंपनी रोखे जारी करण्याचे प्रमाण ९ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, जे भांडवल निर्मितीमध्ये बाजारांची वाढती भूमिका अधोरेखित करते. अलीकडील बाजारातील घसरणीनंतरही, बाजार भांडवल हे जीडीच्या तुलनेत जवळपास १२८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दहा वर्षांपूर्वी ते जीडीपीच्या तुलनेत सुमारे ६९ टक्क्यांवर होते.पांडे म्हणाले की, वाढत्या गुंतवणूकदार वर्गामुळे पारदर्शकता, गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि बाजाराची अखंडता सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी नियामक आणि बाजार मध्यस्थांवर येते. सेबीचा दृष्टिकोन हा गुंतवणूकदारांचे संरक्षण, सुलभ उपलब्धता आणि बाजाराचा विकास यांच्यात संतुलन साधणाऱ्या सर्वोत्तम नियमनाचा आहे, असे ते म्हणाले.
भांडवल उभारणीची कार्यक्षमता सुधारणे, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीला चालना देणे, कॉर्पोरेट बॉण्ड बाजार अधिक सखोल करणे आणि मध्यस्थांसाठी अनुपालन आवश्यकता सुलभ करणे या उद्देशाने ‘सेबी’ने अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत, असेही ते म्हणाले. या प्रत्येक नियामक सुधारणा आणि बाजारातील उपक्रमाने अंतिमतः गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल, हे पाहिले पाहिजे. त्यांनी स्पष्ट केले की, जर गुंतवणूकदाराला माहिती दिली जात आहे, तो संरक्षित आहे आणि त्याला योग्य वागणूक मिळत आहे असे वाटले, तर त्याचा आत्मविश्वास आणि सहभाग अधिक वाढेल आणि ज्या परिणामी बाजारपेठ एका मजबूत आणि शाश्वत पायावर वाढत राहिल.
