SEBI New Rules for Celebrities details on social media: सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीच्या प्रस्तावित जाहिरात कायद्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ५ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असणे हे लवकरच ‘सेलिब्रिटी’ म्हणून पात्र ठरण्यासाठी पुरेसे ठरू शकते. नुकत्याच जाहीर केलेल्या एका पत्रामध्ये, सेबीने ब्रँड स्तरावर सेलिब्रिटी एंडोर्समेंटला परवानगी दिली आहे. सेबीने सेलिब्रिटीची व्याख्या विस्तृत करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये चित्रपट अभिनेत, खेळाडू, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, टेलिव्हिजन अँकर्स, रिॲलिटी शो विजेते आणि अगदी व्हर्च्युअल मानवासारख्या अवतारांचाही समावेश असेल.

प्रस्तावित कायद्यानुसार एखादी व्यक्ती नमूद केलेल्या आठ निकषांपैकी कोणताही एक निकष पूर्ण केल्यास सेलिब्रिटी म्हणून पात्र ठरेल, ज्यामुळे सेलिब्रिटी एंडोर्समेंट नियमांतर्गत कोण येते हे ठरवण्यासाठी एक कायदा उपलब्ध होईल.

पहिल्या श्रेणीमध्ये अशा व्यक्तींचा समावेश आहे, ज्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कोणत्याही सेलिब्रिटी यादीच्या अव्वल ५० मध्ये स्थान मिळवतात. ही क्रमवारी सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि ती एका वर्षापेक्षा जुनी नसावी.

दुसऱ्या निकषामध्ये अशा कलाकारांचा समावेश होतो ज्यांनी मुख्य प्रवाहातील किंवा लोकप्रिय चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, टीव्ही शो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका किंवा प्रमुख भूमिकांपैकी एखादी भूमिका साकारली आहे.

या प्रस्तावित कायद्याद्वारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचाही अधिकृतपणे या व्याख्येत समावेश करण्यात आला आहे. युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्मवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स किंवा सबस्क्राइबर्स असलेल्या इन्फ्लुएन्सरला ‘सेलिब्रिटी’ मानले जाईल.

खेळाडू आणि टीव्ही कलाकारांसाठी काय आहेत नियम?

याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनाही या प्रस्तावित कायद्याद्वारे सेलिब्रेटी म्हणून ओळख मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीय संघांचे सदस्य तसेच ऑलिम्पिक गेम्स, आशियाई गेम्स, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा समावेश होतो.

यात टीव्ही कलाकारांचाही समावेश करण्यात आला आहे. क्विझ शो, पाककलेचे कार्यक्रम, बातम्यांचे कार्यक्रम, विनोदी कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा आणि पुरस्कार सोहळे यांसारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणून किमान एक हंगाम किंवा किमान दहा भागांसाठी काम केलेल्या व्यक्ती या प्रस्तावित आराखड्यानुसार ‘सेलिब्रिटी’ म्हणून पात्र ठरतील.

या प्रस्तावित कायद्याचा उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, एंडोर्समेंट नियम वेगाने बदलणाऱ्या प्रसारमाध्यम आणि जाहिरात क्षेत्राशी सुसंगत राहतील.