Seema Kamath Gifting Shares Raksha Bandhan : रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून सोने किंवा एखादी आवडती भेटवस्तू देतो. पण, बदलत्या काळानुसार बहीणही भावाला रिटर्न गिफ्ट देण्याचा नवीन ट्रेंड रूढ होत आहे. यातही एका बहिणीने या परंपरेला फाटा देत याला आधुनिक ‘फायनान्शियल’ टच देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी ‘झिरोधा’चे संस्थापक अन् सीईओ नितीन कामथ यांची पत्नी सीमा कामथ यांनी आपल्या भावाला रक्षाबंधनानिमित्त असेच एक गिफ्ट दिलं आहे.
नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या पत्नीचा एक फोटो शेअर करत या अनोख्या रिटर्न गिफ्टबद्दल माहिती दिली आहे. “मला अजूनही रक्षाबंधनच्या रिटर्न गिफ्टची संकल्पना पूर्णपणे समजलेली नाही; पण सीमाला ती नीट समजली आहे. ती यंदा तिच्या भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून शेअर्स देणार आहे,” असे कामथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आर्थिक भविष्याची भेट…
साधारणपणे रक्षाबंधननिमित्त कपडे, चॉकलेट्स किंवा स्मार्टफोनसारख्या वस्तू दिल्या जातात. या वस्तूंचा वापर केल्याने त्यांचे आर्थिक मूल्य शून्य होते. याउलट चांगल्या कंपन्यांचे शेअर्स भविष्यात चक्रवाढ वाढ देतात. शेअर्स जर दीर्घकाल बाजारात ठेवले तर त्यातून भविष्यासाठी मोठी आर्थिक संपत्ती निर्माण होऊ शकते.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांची तुफान पसंती
नितीन कामथ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या कल्पनेचे जोरदार स्वागत केले आहे. एका युजरने लिहिलंय की “शेवटी चक्रवाढ परतावा देणारे रक्षाबंधन गिफ्ट मिळाले!”. तर दुसऱ्या एका युजरने “चॉकलेट्स संपतात, कपडे विसरले जातात, पण एक चांगली गुंतवणूक दीर्घकाळासाठी मोलाची ठरते,” अशी प्रतिक्रिया दिली.
शेअर्स गिफ्ट करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
शेअर्स भेट देणे ही उत्तम संकल्पना असली तरी समभागांचे मूल्य बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असते. त्यामुळे यात जोखीम समाविष्ट असते.
शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी भाऊ आणि बहीण दोघांकडेही सक्रिय डीमॅट खाते असणे अनिवार्य आहे.
नातेवाईकांना (भाऊ-बहीण) दिलेली भेटवस्तू प्राप्तीकरातून करमुक्त असते. मात्र, भविष्यात ते शेअर्स विकून नफा कमावल्यास त्यावर ‘कॅपिटल गेन्स टॅक्स’ लागू होतो.
