मुंबई : जागतिक भांडवली बाजारांमधील कमकुवत कलामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील पाच शतकी घसरणीमुळे सलग तीन सत्रातील तेजीला लगाम बसला.

सत्राअखेर सेन्सेक्स ५०३.७६ अंशांनी घसरून ८३,३१३.९३ पातळीवर स्थिरावला. दिवसादरम्यान, त्याने ६६६.०७ अंश गमावत ८३,१५१.६२ ही नीचांकी पातळी गाठली होती. निफ्टी निर्देशांक देखील १३३.२० अंशांनी घसरून २५,६४२.८० पातळी बंद झाला.

देशांतर्गत आघाडीवर अमेरिका-भारत व्यापार कराराबद्दलच्या आशावादामुळे आलेल्या तीव्र तेजीनंतर बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. शिवाय प्रतिकूल जागतिक संकेतांमुळे बाजारावर आणखी दबाव वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमधील व्यापक विक्रीची चिंता आणि अमेरिका-इराणमधील वाढलेल्या तणावामुळे जोखीम टाळण्याची गुंतवणूकदारांची भावना आहे.

बाजाराचे आता रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण बैठकीकडे लक्ष लागले आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयटीसी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. तर दुसरीकडे ट्रेंट, टाटा स्टील, स्टेट बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग वधारून बंद झाले.

देशांतर्गत भांडवली बाजारात मर्यादित श्रेणीत व्यवहार सुरू आहेत. यामुळे ‘थांबा आणि वाट पहा’ असे संकेत मिळत आहेत. नवीन देशांतर्गत प्रेरक घटकांच्या अभावी गुंतवणूकदार सावध भूमिकेत आहेत. – पोनमुडी आर, मुख्याधिकारी, एनरिच मनी.