मुंबई : युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या इराणसोबतच्या करारासाठी वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर, खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. या पार्श्वभूमीवर, बुधवारी प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने ९४० अंशांची जोरदार मुसंडी मारली.

दिवसाच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्याने सेन्सेक्स ९४०.७३ अंशांनी ( १.२२ टक्के) वधारला आणि ७७,९५८.५२ या पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, सेन्सेक्समध्ये १,००४.९९ अंशांची कमाई करत ७८,०२२.७८ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. निफ्टी २९८.१५ अंशांनी (१.२४ टक्के) वधारून २४,३३०.९५ या पातळीवर बंद झाला.

इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाल्याचा दावा करत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीमधून जहाजांना सुरक्षा पुरवणाऱ्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ला स्थगिती दिली आहे. इराणच्या प्रतिनिधींशी अंतिम करार करण्याच्या दिशेने पाऊल पुढे पडल्याचे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर सांगितले. पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीवरून, तसेच इराणविरुद्धच्या मोहिमेदरम्यान मिळालेले लष्करी यश आणि त्याव्यतिरिक्त, इराणच्या प्रतिनिधींशी अंतिम करार करण्याच्या दिशेने झालेली मोठी प्रगती या बाबी विचारात घेऊन, परस्पर सहमतीने असा निर्णय घेतला असल्याचेही ट्रम्प म्हणाले. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे तिथे अडकलेल्या जहाजांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू करण्यात आले होते.

जागतिक तेल बाजाराचा मापदंड मानले जाणारे ‘ब्रेंट क्रूड’ ८ टक्क्यांनी घसरून १०१.१ अमेरिकी डॉलर प्रतिपिंप या पातळीवर आले. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक पातळीवर आशावाद निर्माण झाला आहे, परिणामी खनिज तेलाचे दर १०० प्रतिपिंपापर्यंत खाली आले आहेत भारतासारख्या, आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला यामुळे तात्काळ दिलासा मिळण्याची आशा आहे, असे ‘लाईव्हलाँग वेल्थ’चे संस्थापक आणि संशोधन विश्लेषक हरीप्रसाद के. यांनी सांगितले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी इंटरग्लोब एव्हिएशन, ट्रेंट, एशियन पेंट्स, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांच्या समभागांनी तेजीचे नेतृत्व केले.
दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग मात्र पिछाडीवर राहिले.

वाढीची कारणे

  • अमेरिका-इराण शांतता करार पूर्णत्वास जाण्याची आशा
  • खनिज तेलाचे दर १०० प्रतिपिंपावर
  • अमेरिकेच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ला स्थगिती