मुंबई : अमेरिका-इस्रायल, इराण यांच्यातील युद्धाच्या परिणामी खनिज तेलाच्या किमतीतील भडक्याचे भांडवली बाजारात बुधवारी भीतीदायी पडसाद उमटले. सेन्सेक्स-निफ्टी जवळपास दीड टक्क्याने गडगडले, तर रुपयाने डॉलरमागे पहिल्यांदाच ९२ खालील पातळी ओलांडून, ९२.३५ असा ऐतिहासिक नीचांक दाखवला.
तेलाच्या वाढत्या किमती आणि व्यापारातील अडथळे हे आयातीवर मोठी मदार असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणणारे ठरतील. देशांतर्गत महागाईचा परिणाम आणि चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांत चिंतेचे वातावरण आहे. त्याचेच प्रतिबिंब १,१२२.६६ अंशांनी म्हणजेच १.४० टक्क्यांनी घसरलेल्या सेन्सेक्समध्ये दिसून आले. बुधवारी सलग चौथ्या सत्रात घसरण होत, सेन्सेक्स ८० हजारांखाली म्हणजेच ७९,११६.१९ पातळीवर स्थिरावला. निफ्टी निर्देशांकानेही सलग तिसर्या घसरणीतून सहा महिन्यांतील नीचांकी पातळी दाखवली. हा निर्देशांक ३८५.२० अंशांच्या नुकसानीसह २४,४८०.५० पातळीवर बंद झाला.
जगभरातील बाजारातील पडझडीचे पडसाद स्थानिक बाजारात उमटले. तथापि भारतीय बाजारांच्या तुलनेत कोरिया, जपान, हाँगकाँग या प्रमुख आशियाई बाजारांतील घसरणीचे प्रमाण खूपच अधिक आहे.
तेलाचा उच्चांक
आखातातील संघर्षामुळे, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा मानदंड असलेल्या ब्रेंट क्रूडची किंमत पिंपामागे ८२.७७ डॉलरपर्यंत वाढली. मागील दीड वर्षातील अर्थात जुलै २०२४ नंतर तेलाने गाठलेली ही सर्वाधिक किंमत आहे. गत चार सत्रांमध्येच ती जवळजवळ १७ टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारच्या सत्रात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किमतीही लक्षणीय वधारल्या.
गुंतवणूकदारांचे १६.३२ लाख कोटींचे नुकसान
वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन सत्रांत १६.३२ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. याआधी सोमवारच्या सत्रातही सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात प्रत्येकी सव्वा टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. मंगळवारी होळीनिमित्त सार्वजनिक सुट्टीमुळे बाजारात व्यवहार झाले नाहीत. आघाडीच्या समभागांमध्ये, लार्सन अँड टुब्रोने चार सत्रांत एकंदर १२ टक्क्यांची घसरगुंडी दाखवली आहे. त्यापाठोपाठ टाटा स्टीलमध्ये मोठी घसरण झाली आहे.
अमेरिकी हल्ल्यात इराणच्या युद्धनौकेला जलसमाधी
कोलंबो : इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या युद्धनौकेचा अमेरिकेच्या पाणबुडीने वेध घेतल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेग्सेट यांनी दिली. ही युद्धनौका अरबी समुद्रात श्रीलंकेच्या किनार्याजवळ बुडाली. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने प्रथमच अशा प्रकारे पाणबुडीने हल्ला केल्याचा हेग्सेट यांनी सांगितले. दरम्यान, या युद्धनौकेवरील ३२ जखमी सैनिकांना कोलंबोच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली.
जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत
न्यूयॉर्क : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ठप्प झालेल्या तेलाच्या वाहतुकीपाठोपाठ इराण युद्धातून जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करणारा परिणाम दिसून येत आहे. विशेषत: भारतातील औषधनिर्माण, आशियातील सेमीकंडक्टर आणि खतांसारख्या तेलावर आधारीत उत्पादनांपुढे संकट निर्माण झाले आहे. मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत.
युद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेचे सर्वतोपरी प्रयत्न
इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका निर्णायक, विनाशकारी आणि दया न दाखवता विजय मिळवत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री पिट हेग्सेट यांनी बुधवारी सांगितले. युद्धात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला वेळ घेतला जाईल, असे हेग्सेट म्हणाले.
‘…तर जगभरातील इस्रायलचे दूतावास लक्ष्य’
इस्रायलने इराणपाठोपाठ लेबेनॉनवरही हल्ला केला असून लेबेनॉनची राजधानी बैरुतमधील इराणी दूतावास उडवून देण्याची धमकी दिली आहे. इस्रायलने बैरुतमधील इराणी दूतावासावर सशस्त्र हल्ला केला तर इराण जगभरातील इस्रायली दूतावासांना लक्ष्य करेल, अशा इशारा इराणी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने दिला.
