मुंबई : अर्थसंकल्पाच्या दिवशी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, तेल आणि वायू, बँकिंग आणि वाहननिर्मिती या क्षेत्रातील ब्लू-चिप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्यामुळे सोमवारच्या सत्रात सेन्सेक्सने ९४३ अंशांची उसळी घेतली. जागतिक खनिज तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळेदेखील जगभरातील भांडवली बाजारांना दिलासा मिळाला.
सत्राअखेर सेन्सेक्स ९४३.५२ अंशांनी वधारून ८१,६६६.४६ पातळीवर स्थिरावला. दिवसादरम्यान, त्याने १,००९.३१ अंशांची झेप घेत ८१,७३२.२५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टी २६२.९५ अंशांनी वधारला आणि २५,०८८.४० अंशांवर बंद झाला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या, जागतिक विदा केंद्रांसाठी (डेटा सेंटर) दीर्घकालीन कर सवलती दिल्या आणि कृषी व पर्यटन क्षेत्रालाही बळ दिले आहे. त्यांनी २०२६-२७ साठी ५३.५ लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, जो वाढत्या जागतिक जोखमींदरम्यान वाढ कायम ठेवण्यासाठी एक दीर्घकालीन आराखडा मानला जात आहे.
आगामी काळात पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूसह पाच प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका होणार असूनही, लोकप्रिय घोषणा टाळून, या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधांवरील खर्च सुरू ठेवण्याचे संकेत दिले. मात्र वायदे बाजारातील (एफअँडओ) व्यवहारांवर लागू असलेला रोखे उलाढाल कर अर्थात एसटीटीमध्ये वाढ केल्याने शेअर बाजाराने सहा वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण अनुभवली. परिणामी, गुंतवणूकदारांचे सुमारे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
‘एफअँडओ’वरील एसटीटी वाढीचा परिणामामुळे रविवारच्या सत्रातील अभूतपूर्व अस्थिर सत्रानंतर सोमवारी बाजारात लक्षणीय सुधारणा दिसून आली.
आर्थिक विकास आणि वित्तीय शिस्तीवर स्पष्ट भर देणाऱ्या अर्थसंकल्पातील धोरणात्मक सातत्यता यामुळे मध्यम ते दीर्घ-मुदतीच्या कमाईच्या दृष्टिकोनावर विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. जागतिक खनिज तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे, जे अमेरिका आणि इराणमधील भू-राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे दर्शवत आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

