मुंबई : भारतात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे आणि अमेरिका-इराण युद्धबंदी कराराबाबतच्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. अखेरच्या तासांमधील समभाग विक्रीच्या दबावामुळे ‘सेन्सेक्स’ १,०९२.०६ अंशांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजारचा ‘निफ्टी’ २४,५५० च्या खाली बंद झाला. बाजारातील घसरणीचे हे सलग तिसरे सत्र आहे.

सप्ताहअखेर सेन्सेक्स १०९२.०६ अंशांनी घसरून ७४,७७५.७४ अंकांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्समध्ये तब्बल १,२७८.६९ अंश गमावत ७४,५८९.११ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे, निफ्टीमध्ये ३५९.४० अंशांची घसरण झाली आणि तो २३,५४७.७५ अंशांवर बंद झाला.

बाजारातील पडझडीची मुख्य कारणे:

कमकुवत मान्सूनचा अंदाज: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात पाऊस सामान्य असेल, मात्र देशाच्या उर्वरित भागात तो सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्यास आगामी काळात अन्नधान्याची महागाई वाढण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे.

भू-राजकीय अनिश्चितता: अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदी कराराच्या मुदतवाढीबाबत सुरुवातीला सकारात्मकता होती, मात्र अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी न मिळाल्याने जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. सप्ताहअखेरचे सत्र असल्याने गुंतवणूकदारांनी नवीन जोखीम घेणे टाळले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी, पॉवर ग्रिड, इंटरग्लोब एव्हिएशन, एनटीपीसी, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. तर टेक महिंद्र, एचसीएल टेक, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या कंपन्यांचे समभाग मात्र तेजीसह विसावले.

तज्ज्ञांचे मत काय?

आयएमडीने मान्सून सरासरीच्या ९० टक्क्यांपर्यंतच बरसण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर बाजारात सर्वच स्तरांवर विक्रीचा दबाव दिसला. कमी पाऊस आणि एल निनोच्या संकटामुळे महागाई वाढण्याची चिंता आहे. मात्र, खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण (ब्रेंट क्रूड १.५२ टक्क्यांनी घसरून ९२.२९ डॉलर प्रतिपिंप) आणि रोख्यांवरील परतावा दर कमी झाल्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे.-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड