मुंबई : आखाती देशांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी क्षेत्रात नव्याने तणाव निर्माण झाल्यामुळे आणि अमेरिका-इराण यांच्यातील शस्त्रसंधी मोडण्याच्या भीतीने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये पडझड झाली. त्यापरिणामी मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रीच्या दबावाने घसरले.

खनिज तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत. अस्थिरतेने भरलेल्या मंगळवारच्या सत्रात, सेन्सेक्स २५१.६१ अंशांनी घसरून ७७,०१७.७९ या पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, सेन्सेक्सने ७५४.३७ अंश गमावत ७६,५१५.०३ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे निफ्टी ८६.५० अंशांनी घसरून २४,०३२.८० या पातळीवर बंद झाला.

देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारचे सत्र अस्थिर राहिले आणि बाजाराची सांगता घसरणीसह झाली. महत्त्वाच्या राज्यांमधील निवडणुकांनंतर निर्माण झालेला आशावाद मावळला आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांच्या भावना पुन्हा जागतिक बाजारातील मंदीशी सुसंगत बनल्या आहेत.

खनिज तेलाच्या वाढत्या किमतींचा रुपयावर दबाव कायम राहिला, ज्यामुळे रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतानाही, सध्या सुरू असलेल्या तिमाही निकालांच्या हंगामामुळे ज्यांची तिमाही कामगिरी अपेक्षांपेक्षा समाधानकारक राहिली आहे त्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला आणि त्यामुळे निवडक समभागांमध्ये ‘बॉटम-फिशिंग’ला (किमान पातळीवर असताना खरेदी करण्याच्या प्रवृत्तीला) चालना मिळाली, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी आयसीआयसीआय बँक, इटर्नल, टेक महिंद्र, ऍक्सिस बँक, भारती एअरटेल आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर महिंद्र अँड महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक वधारले.